कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकीसाठी महिलांसाठी आरक्षित असलेल्या 61 जागांसाठी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारी लढण्यासाठी 224 उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
महापालिकेच्या 122 जागांकरीता 31 पॅनलमधून निवडणूक होणार आहे. निवडणूकी आधीच 20 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यामध्ये भाजपच्या 14 आणि शिंदे सेनेच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे. 20 बिनविरोध उमेदवारांमध्ये 12 जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. त्यांनी निवडणूकीच्या आधीच बिनविरोध निवडून येण्याची बाजी मारली आहे.त्यामुळे आत्ता प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया घेऊन 102 प्रभागात निवडणूक घेतली जाणार आहे. महापालिकेच्या एकूण जागांपैकी अनुुसूचित जातीच्या महिला उमेदवारांकरीता 6, अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारांकरीता 2 जागा आणि नागरीकांच्या मागास प्रवर्गाकरीता महिलांसाठी 16 जागा आरक्षित होत्या.
याशिवाय खुल्या प्रवर्गाकरीता 37 जागा महिलांसाठी आरक्षीत होत्या. महापालिकेच्या निवडणूकीत भाजपकडून 22 महिला उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर शिंदेसेनेकडून 34 महिला निवडणूकीच्या रिंगणात आहेत. उद्धव सेनेकडून 36 महिलांना उमेदवारी दिली गेली आहे. 36 महिला निवडणूक लढवित आहेत. मनसेकडून 16 महिला निवडणूकीत नशीब आजमावित आहेत. काँग्रेस पक्षाकडून 23 महिलांना उमेदवारी दिली गेली आहे. या निवडणूकीत भाजप आणि शिंदे सेनेची महायुती असल्याने एकूण 56 महिलांना उमेदवारी दिली आहे. तर मनसे आणि उद्धव सेनेची युती असल्याने त्यांनी एकूण 52 महिलांना निवडणूकीची संधी दिली आहे. काँग्रेस पक्षाने 23 महिलांना उमेदवारी दिली. भाजप, शिंदे सेना, उद्धव सेना, मनसे आणि काँग्रेस पक्ष मिळून 131 महिलांना उमेदवारी दिली आहे. उर्वरीत 93 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, वंचित बहुजन आघाडी आरक्षित प्रभागानुसार महिला उमेदवारांना संधी दिली आहे.
मात्र शिंदे सेना आणि भाजप तसेच मनसे आणि उद्धव सेना या दोन्ही पक्षाची युती लढवित आहे. जे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहे. या पूर्वी शिवसेनेच्या वैयजंती घोलप, कल्याणी पाटील, विनीता राणे यांनी महापौर पद भूषविले आहे. आत्ता महापालिकेची निवडणूकीसाठी जानेवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. महापालिकेने प्रभाग आरक्षण जाहिर केले होते. मात्र अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहिर केलेले नाही. महापौर पदासाठी महिला उमेदवाराकरीता आरक्षण पडल्यास निवडणूक रिंगणात नशीब आजमवणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या एका महिला उमेदवाराच्या गळयात महापौर पदाची माळ पडू शकते. 2015 च्या पालिका निवडणुकीतील 61 महिला प्रभागा सह अन्य तीन खुल्या प्रभागातून तीन महिला अश्या 64 महिला नगरसेवक पदी निवडून आल्या होत्या.