

खानिवडे: पुढारी वृत्तसेवा वसई तालुक्यातील कशीद कोपर गावात नव्या वर्षाच्या पहिल्याच रात्री एका हिंस्त्र प्राण्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्राणी बिबट्या असावा, या शक्यतेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिक आता समूहाने (झुंडीने) वावरत आहेत. दरम्यान, मांडवी वनविभागाने याची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला असून, तो नेमका बिबट्या आहे की रानमांजर, याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या कशीद कोपर गावातील चौधरी कुटुंबाच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात १ जानेवारीच्या रात्री हा प्रकार कैद झाला. हा प्राणी घरासमोरील कोंबड्यांच्या पिंजऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी याच गावात बिबट्याने दहशत माजवली होती, त्या आठवणीने ग्रामस्थ पुन्हा हादरले आहेत. रात्री-अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांनीही या प्राण्याची चाहूल लागल्याचे सांगितले आहे.
दिसणारा प्राणी आकाराने लहान असल्याने, परिसरात त्याची आई किंवा इतर भावंडे असण्याची शक्यता नागरिक वर्तवत आहेत. यामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली असून, लोक रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळत आहेत. घराबाहेर पडताना लोक समूहाने जात आहेत. तीन वर्षांपूर्वी वनविभागाने जखमी बिबट्याला जेरबंद केले होते, तशीच कारवाई आताही तातडीने व्हावी, अशी मागणी कशीद कोपरच्या रहिवाशांनी केली आहे.
मांडवी वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असली, तरी सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने वनविभागाने साशंकता व्यक्त केली आहे. प्राथमिक तपासानुसार, फुटेजमधील प्राण्याची उंची आणि त्याच्या शेपटीची लांबी बिबट्याशी जुळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा प्राणी 'बाऊल' (रानमांजर) असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
"सीसीटीव्हीमध्ये दिसणारा प्राणी नेमका बिबट्याच आहे का, याची खातरजमा केली जात आहे. फुटेज अस्पष्ट असून त्या प्राण्याची शेपटी बिबट्यासारखी लांब दिसत नाही. तरीही नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग सतर्क असून तपास सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये."
— प्रशांत देशमुख, वनक्षेत्रपाल, मांडवी वनपरिक्षेत्र.
कशीद कोपर परिसर हा तुंगारेश्वर अभयारण्यापासून जवळ आहे. जंगलात लपण्यासाठी असलेली झुडपे, मानवी वस्तीत सहज उपलब्ध होणारे कुत्रे, कोंबड्या आणि पाण्याची उपलब्धता यामुळे या भागात हिंस्त्र प्राण्यांचा संचार होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.