पालघर : बाबासाहेब गुंजाळ
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीत जिंदाल उद्योगसमूहाचा स्टील कारखाना १९८४ पासून सुरू आहे. ८० या दशकात पूर्वी येथे पिरामल स्टील कारखाना होता, ज्यात मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार मिळत होता. मात्र जिंदाल उद्योगाने ताबा घेतल्यानंतर स्थानिक कामगारांना कामावरून कमी करून बाहेरील कामगारांची नेमणूक केल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे.
जिंदाल उद्योगाने २०२२ मध्ये २४.५६ कोटी तर २०२३ मध्ये तब्बल २७.१४ कोटी रुपये सीएसआरमधून खर्च केल्याचा अहवाल त्यांच्या संकेतस्थळावर आहे. मात्र हा खर्च मुख्यतः ओडिशा, हरियाणा, दिल्ली एनसीआर, झारखंड आदी राज्यांमध्ये शाळा, महिला कौशल्य केंद्र, आरोग्य व पोषण प्रकल्प, पर्यावरण शिबिरे यावर करण्यात आला. पालघर जिल्ह्यात मात्र एक रुपयाही खर्च झाल्याचे आढळून आलेले नाही. उलट बोईसर उड्डाणपुलाजवळील महत्त्वाचा भूखंड रिकामा करून सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च फक्त गार्डनसाठी करण्यात आला, अशी स्थानिक नेत्यांची टीका आहे.
याठिकाणी पूर्वी स्थानिक तरुण आपल्या ट्रक उभेकरून व्यवसाय करत होते. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा भूखंड रिकामा केला. ३ कोटी खर्च करून तिथे गार्डन उभे केले. एकीकडे रोजगार द्यायचा नाही दुसरीकडे रोजगाराची जागा बळकावयाची. असे जिंदाल वर आरोप आहेत.
रोजगारात स्थानिकांना वंचित ठेवले?
महाराष्ट्र शासनाचा उद्योगात ८०% स्थानिक गावकऱ्यांना रोजगार देण्याचा कायदा असताना जिंदाल नेहमी परप्रांतीय लोकांना रोजगार देत आहे. याउलट स्थानिकांना रोजगाराच्या संधी नाकारत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, उद्योगाने भूमिपुत्रांना रोजगारच दिला नाही. कंपनीच्या जुन्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कामगारांना कायम दुय्यम वागणूक दिली. युनियन संपवून टाकण्यात आली असून कामगार संघटना अस्तित्वात नाही. स्टील कारखान्यात अपघात वारंवार घडत असतात तरी कामगारांची मागणी नको? म्हणून स्थानिकांना कामावर घेतले जात नाही का? असा आरोप आहे.
२०१३ ला बंदर रोखले, आता पुन्हा प्रयत्न
२०१३ मध्ये नांदगाव येथे बंदर उभारण्याचा जिंदाल उद्योगाचा प्रयत्न स्थानिकांनी एकमुखाने हाणून पाडला होता. आता पुन्हा मुरबे गावाजवळ २ हजार एकर जमीन घेऊन बंदर उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायतींना वा गावकऱ्यांना विश्वासात न घेता थेट जनसुनावणी आयोजित करण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.