Jawhar Town Hall Repair Pudhari
पालघर

Jawhar Town Hall Repair: जव्हार टाऊन हॉल दुरुस्तीवर वाद; दीड कोटी खर्चावरून नवीन इमारतीची मागणी

80 वर्षे जुनी इमारत धोकादायक अवस्थेत; नगरसेविकांचा निधी अपव्ययाचा आरोप, नव्याने बांधकामाचा आग्रह

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

ऐतिहासिक जव्हार शहरातील तब्बल 80 वर्ष जुनी टाऊन हॉल च्या इमारतीची आता नव्याने दुरुस्ती होणार असून यासाठी जव्हार नगरपरिषदेकडून तब्बल दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे कधीही पडण्याच्या मार्गावर असलेल्या या टाउन हॉलचे मजबुतीकरण होणार आहे. मात्र आता या दुरुस्तीसाठी दीड कोटींचा निधी खर्च होण्याच्या प्रक्रियेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका अश्विनी चव्हाण यांनी आक्षेप घेतला असून सदरची इमारत 80 ते 90 लाखात नवीन होऊ शकते. यामुळे अगदी पडण्याच्या मार्गावर असलेल्या इमारतीवर दुरुस्तीसाठी दीड कोटी खर्च करण्यापेक्षा ही इमारत नवीन बांधण्यात यावी असे पत्र नगर परिषदेला चौहान यांच्याकडून देण्यात आलेले आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर जव्हार शहरात आता अनेक विकास कामे हाती घेण्यात येतील. मात्र यातील गरजेची किती आणि कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे यावरून येथील नगर परिषदेच्या नगरसेवकांमध्ये भविष्यात जुंपण्याची शक्यता निर्माण होत आहे. यामुळे 80 वर्षाच्या जुन्या इमारतीवर दुरुस्तीसाठी एवढा मोठा खर्च करणे योग्य आहे की अयोग्य ?याबाबत जव्हार शहरात चर्चा रंगल्या आहेत.

जव्हार नगरपरिषद अंतर्गत असलेल्या टाऊन हॉल ला आज 80 वर्ष झाली आहेत.या इमारतीमध्ये काही वर्षांपूर्वी जव्हार नगरपरिषदेचे कामकाज देखील करण्यात येत होते. मात्र ही इमारत वापरण्या योग्य नसल्याचा अहवाल ऑडिट मधून देण्यात आला होता. ऑगस्ट 2024 च्या ऑडिट रिपोर्ट नुसार सर्व पर्लिन आणि गर्डर गंजलेले असून त्यांना मोठ्या भेगा पडल्याचे आढळून आले आहे. गॅल्व्हनाइज्ड लोखंडी गज आणि पत्र्याला गंज लागलेला आहे. जागेवर केलेल्या प्रत्यक्ष तपासणीत असे दिसून आले आहे की, काही जी.आय. पत्रे गंजलेले, चपटे झालेले आहेत, त्यांचे सौंदर्य चांगले नाही आणि त्यांची आकार्यताही कमी झाली आहे. याचा अर्थ जी.आय. पत्र्यांचे आयुष्यमान कमी झाले आहे.आणि त्यांची गुणवत्ता खालावली आहे, फरशी ही गर्डर्सवरील नेहमीच्या जुन्या प्रकारच्या स्टील प्लेट्सची असून, तिच्या पृष्ठभागावर झीज आणि गंज दिसून येत भिंतींवर मोठ्या भेगा आढळून आल्या. सच्छिद्र पदार्थ, भेगा आणि तडे यांमधून गळती होत असून, त्यामुळे भिंतींवर ओलसर डाग पडत आहेत. बहुतेक दरवाजे आणि खिडक्यांची झीज झालेली आहे.असा अहवाल दोन वर्षापूर्वी देण्यात आलेला होता. याचाच आधार घेऊन या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आता दीड कोटींचा खर्च होणार आहे.

या कामाचे पूजन देखील लोकप्रतिनिधींच हस्ते करण्यात आले असून या कामांना आता प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे दिसून येते की दुमजली इमारत असून सध्या या इमारतीच्या खालील भागात व्यापारी गाळे असून त्या ठिकाणी वर्षानुवर्ष व्यापारी आपला व्यवसाय करीत आहेत. या इमारतीचे ऑडिट झाल्यानंतर ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचे अहवाल आल्यानंतर देखील या ठिकाणी दुकाने सुरू असल्याचे दिसून येते.

अश्विनी चौहान यांची नवीन बांधकामांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका अश्विनी चौहान यांनी नुकतेच जव्हार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना एक पत्र दिले असून त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की ही इमारत पाडून बांधावयास 80 ते 90 लाखाचा खर्च होणार असताना या इमारतीच्या दुरुस्तीसाठी दीड कोटींचा खर्च करणे म्हणजे नगर परिषदेच्या विकास निधीचा अपव्यय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदरची इमारत 1610 स्क्वेअर फुट चे असताना यावर दुरुस्तीसाठी एवढा खर्च करणे योग्य नसल्याचे चौहान यांचे म्हणणे आहे. यामुळे या विस्तारीकरणाच्या कामाऐवजी नवीन बांधकामाचे काम काम हाती घेण्यात यावे असे या पत्रात म्हटले आहे यामुळे जव्हार नगर परिषदेकडून करण्यात येणारे हे दुरुस्तीचे काम आता वादात सापडले आहेत.

80 वर्षांची इमारत नुसत्या दुरुस्तीने टिकेल का ?

याबाबत जव्हार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माननीय कांबळे यांना विचारले असता त्यांनी या कामासाठी ऑडिट झाले आहे याशिवाय तांत्रिक मान्यता सुद्धा घेण्यात आली आहे प्रशासकीय मान्यता होऊन कामाची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे यामुळे हे काम योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे मात्र ही इमारत अतिशय जुनी असून त्याच पायावर पुन्हा दुरुस्ती करून या इमारतीचे आयुष्य किती वाढणार आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे कारण की कोणतीही वस्तू जुनी झाल्यानंतर त्यासाठी वापरलेले जुने साहित्य आणि एकूणच पाया आणि सिमेंट खांब सुद्धा यांची ताकद काही वर्षानंतर कमी होते यामुळे आता ही इमारत दुरुस्ती व्हावी की नवीन व्हावी याबद्दल मतांतरे सुरू असले तरी कायद्याच्या कसोटीत राहून नगरपरिषद जव्हार हे दुरुस्तीचे काम हाती घेणार की यावर विचार करणार हे पाणी औत्सुक्याचे राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT