जव्हारमध्ये शिंदे गट, अजित पवार गटाची बोलणी फिस्कटली ? pudhari photo
पालघर

Jawhar municipal election : जव्हारमध्ये शिंदे गट, अजित पवार गटाची बोलणी फिस्कटली ?

अजित पवार गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत, भाजपला फायदा होण्याची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

पालघर : जव्हार नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भाजपला वगळून युतीच्या हालचाली सुरू असतानाच आता या दोन्हीमध्ये नगरसेवक पदाच्या अनेक जागा वरून बोलणी फिस्कटली असून आता राष्ट्रवादी अजित पवार गट देखील स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याने जव्हार नगर परिषदेची निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आज तरी आहेत.

वरिष्ठ नेत्यांकडून युतीसाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे मात्र युतीबाबत आत्तापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये दोन ते तीन बैठका झाल्या असून यामधून गणितांची जुळणी झाली नसल्याचे आता समोर येत आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून जवळपास फारकत घेण्याचीच परिस्थिती असल्याने आता युती किंवा महायुती होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

यामुळे याचा थेट फायदा भाजपाला होऊ शकतो असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जवळपास सर्वच जागावर एकमत झाले असून आघाडी निश्चित झाल्याचे देखील समजते आहे. आता उमेदवारी भरण्यासाठी केवळ तीनच दिवस शिल्लक असल्याने सर्व इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्ष यांची धावपळ उडाली आहे.

उमेदवार ठरविणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावर दावा करणे आधी सगळी बोलणी महायुतीमध्ये होण्याच्या आधीच भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा दावा करण्यात येऊन काही अंशी प्रचार सुद्धा सुरू झाल्याने महायुती होणार नाही अशी अटकळ बांधली जात होती असे असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून भाजपाला वगळून महायुती करण्यासाठी हालचाली सुरू होत्या त्यानुसार अनेक बैठका सुद्धा झाल्या मात्र आता नवीन माहिती समोर येत असून या दोन्ही मधील चर्चा फिस्कटल्याचे सूत्रांकडून कळत आहे.यामुळे नगरसेवक पदासाठीच नाही तर नगराध्यक्ष पदासाठी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे जिल्हास्तर आणि तालुका स्तरावरील ज्येष्ठ नेते पदाधिकारी हे युती आघाड्याबाबत एकमेकांशी चर्चा करीत असतानाच इच्छुक उमेदवारांनी आपल्या वॉर्ड निहाय क्रमांक टाकून बॅनर पोस्टर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केली असून यामुळे या चर्चांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे देखील बोलले जात आहे.काही जागावर दोन्ही तिन्ही पक्षांनी दावा केल्याने अडचण निर्माण झाले आहेत तर काही उमेदवारांनी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचे धोरण अवलंबल्याने भाजपसह म्हणा किंवा राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यामध्ये आता युती न होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी (शप) ला ऑफर ?

राजकारणात कधीही काहीही होऊ शकते याची प्रचिती आता जव्हार मधील राजकीय हालचाली पाहता येऊ लागली आहे कारण की शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी शप गटाला देखील युतीची ऑफर आल्याची माहिती आता समोर येत असून नगराध्यक्ष पद आम्ही लढवतो आणि नगरसेवक पदावर जास्तीचे राष्ट्रवादी शपचे उमेदवार देऊ असा प्रस्ताव देखील ठेवल्याची माहिती समोर आली आहे मात्र राष्ट्रवादी शप कडून ही ऑफर अमान्य झाल्याचे देखील कळते आहे.यामुळे जव्हार नगरपरिषद निवडणुकीत काहीही संभव असल्याचे आता या सर्व प्रकारातून दिसून येत आहे.महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रश्मीन मणियार, भाजपकडून पूजा उदावंत, तर शिवसेना शिंदे गटाकडून पद्मा रजपूत यांची नावे निश्चित झाल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT