

वाडा : मच्छिंद्र आगिवले
पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा हे आजच्या बहुतांश राजकारणाचे समीकरण बनले असून सामान्य माणसाला प्रमुख पक्षातून उमेदवारी मिळवून निवडणूक लढविणे दुर्मिळ झाले आहे. वाडा नगरपंचायत निवडणुकीत हेच समीकरण लागू पडण्याची शक्यता असून अनेक प्रसिद्ध कंत्राटदार स्वतःसह आपल्या पत्नींसाठी उमेदवारी मिळविण्यात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. पक्षांच्या कार्यालयात सध्या मुलाखती सुरू असून अजून कुणाचेही नाव जाहीर झाले नसले तरी वाडा नगरपंचायत कंत्राटदारांच्या हातचे बाहुले तर बनणार नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वाडा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबरला होणार असून 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तीन दिवस उलटून गेले मात्र अजून एकही अर्ज दाखल झाला नसून पक्षांकडून अधिकृत उमेदवारी मिळण्यात कमालीची गुप्तता पळाली जात आहे.निवडणूक लढवायला आपल्याकडे किती शक्ती आहे याची उमेदवारांना कठोर परीक्षा द्यावी लागत असल्याची माहिती असून बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष काळजी घेत असावेत अशी शक्यता आहे.
युतीची कोणतीही चिन्ह पहायला मिळत नसून वरिष्ठ नेत्यांनी जरी जाहीर केले तरी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल याची कुणालाही खात्री नाही. मनसे व अन्य लहान पक्ष कुठेही पहायला मिळत नसून खरी लढत भाजपा व उबाठा या पक्षांत नगराध्यक्ष पदासाठी होणार हे निश्चित आहे.
नगरपंचायत निवडणूक लढविणे आता सामान्य गोष्ट राहिली नसून सत्तेसाठी पक्ष व उमेदवार साम, दाम, दंड, भेद या सूत्राचा वापर अधिक करण्याची शक्यता असते. निवडणुकीच्या आखाड्यात उतरणे सामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्या बाहेर असून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता मग निवडायचा तरी कसा असा प्रश्न मतदारांना निवडुकीदरम्यान पडणार आहे.
नगरपंचायतीचे महत्वाचे पद असणारे नगराध्यक्ष पद हे जनतेतून थेट निवडले जाणार असल्याने त्यासाठी सर्वच प्रमुख पक्ष टोकाचा संघर्ष करतील यात शंका नाही. महिलांसाठी नगराध्यक्ष पद राखीव असल्याने वाडा शहरातील काही बडे कंत्राटदार आपल्या पत्नींना उमेदवारी मिळविण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे बोलले जात असून नगरपंचायतीचा कारभार कंत्राटदारांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जातीचे समीकरण निर्णायक ?
वाडा शहरातील प्रत्येक प्रभागात विशिष्ट्य जाती व धर्माच्या मतदारांचे संख्याबळ निर्णायक ठरणार असून याच आधारावर प्रामुख्याने निवडणुका लढविल्या जातात असा अनुभव आहे. उमेदवारी देताना प्रमुख पक्ष देखील इतर मुद्द्यांसह जातीच्या मुद्द्याचा अधिक विचार करतात असा इतिहास असून नगराध्यक्ष पदासाठी जातीचे गणित मांडण्यात नेते व कार्यकर्ते व्यस्त आहेत.