खानिवडे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता वसई, विरारमध्ये रॅपिडो ॲपच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा ली कंपनीवर परिवहन कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे. मोटार वाहन निरीक्षक सचिन काशीनाथ कोतापकर यांच्या मार्फत विरार पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी माहिती देताना सांगितले. यामुळे नागरिकांनी रॅपिडो ॲप वापरून प्रवास करू नये असेही सुचवले आहे.
ऑक्टोबर 2025 पासुन द रोपेन ट्रान्सपोटेशन सर्विसेस प्रा.लि. कंपनीकडुन परिवहन विभागाची परवानगी न घेता बेकायदेशिरपणे शासनाची व प्रवाशांची फसवणुक करून रॅपिडो ॲपच्या माध्यामातुन खाजगी दुचाकी वाहनाद्वारे अवैध प्रवासी वाहतुक राजरोसपणे सुरू आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 93 मधील तरतुदी नुसार समुच्चकानी (ऍग्रीगेटर) मोटार व्हेईकल ऍग्रीगेटर गाईडलाईन्स 2020व 25 नुसार ॲप बेस्ड प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक असताना रॅपिडो द रोपेन ट्रान्सपोटेशन सर्विसेस प्रा. लि. कंपनीकडुन अशा कुठल्याही तरतुदींचे पालन न करता विनापरवानगी खाजगी दुचाकीवर प्रवासी वाहतुक सुरू केली आहे.
कलम 66 नुसार खाजगी वाहनातुन प्रवासी वाहतुक करता येत नाही व तसे केल्यास कलम 192 नुसार कारवाईस पात्र आहे. सद्ध्या कंपनीकडून या तरतुदींचा भंग करून प्रवाशांच्या जिवाशी खेळुन बेकायदेशिर प्रवासी वाहतुक सुरू आहे. मोटार वाहन ऍग्रीगेटर नियमावली 2020 मधील नियम क्र. 15 व 17 यांना अनुसरून महाराष्ट्र शासन दिनांक 19/1/2023 च्या अधिसुचनेनुसार परिवहनेत्तर वाहनांचा (दुचाकी, तीन चाकी, चारचाकी) समुच्चयनाच्या व राईड पुलींगच्या उद्देशासाठी वापर करण्यास प्रतिबंध केला आहे.
तरीही सद्य स्थितीत रॅपिडो ॲपच्या माध्यमातुन खाजगी दुचाकी वाहनाद्वारे अवैध प्रवासी वाहतुक करित असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर कंपनीच्या चालकांचा कोणत्याही प्रकारचा चारित्र्य पडताळणीचा दाखला इतर प्रकारची सुरक्षात्मक दृष्ट्या तपासणी केली जात नाही. ही बाब महिला व इतर प्रवाशांच्या जिवीताच्या व सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातुन अत्यंत गंभीर आहे.
ॲपच्या माध्यमातून कोणताही प्रवास करू नये
महाराष्ट्र राज्य शासनाने तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी या संवर्गात आतापर्यंत कोणताही परवाना -लायसन्स दिलेले नसतानाही कंपनीद्वारे वसई विरार शहरात बाईक टॅक्सी विनापरवानगी ऑनलाईन माध्यमातुन सुविधा पुरवूनन तसेच बेकायदेशिर प्रवासी वाहतुक करण्यास प्रोत्साहन देऊन आर्थिक फायदा मिळविणाऱ्या रॅपिडो वर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रवाश्यांना रॅपिडो ॲपच्या माध्यमातून कोणताही प्रवास करू नये. तसेच या ॲपच्या माध्यमातून दुचाकी चालकांनी प्रवासी वाहतूक करू नये असे आवाहन सहाय्यक परिवहन अधिकारी दीपक उगले यांनी परिवहन कार्यालया मार्फत नागरिकांना केले आहे.