

मिरा रोड : मिरा रोड येथे राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका तरुणाने पीडितेची 65 लाखाची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आरोपीने पीडितेकडून नोकरीसाठी तसेच चैनीच्या वस्तू आणि जीवनावश्यक खर्चापोटी मोठी रक्कम खर्च करवून घेतली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी तरुणासह आई-वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा रोड येथे राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीची ओळख 15 ऑक्टोबर 2023 रोजी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चेतन शर्मा (वय 25) रा. अब्रोल नगर, पठाणकोट, पंजाब याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यावर चेतनने तरुणीसोबत साखरपुडा केला आणि लवकरच तिच्याशी विवाह करण्याचे खोटे आश्वासन दिले.
या आश्वासनाचा गैरफायदा घेत, चेतन याने नोकरीचे कारण सांगून पीडितेकडून ऑनलाइन आणि रोख स्वरूपात 7 लाख रुपये घेतले. त्यानंतर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन चेतनने पीडित तरुणीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या व्यतिरिक्त, 2 मे 2024 ते 23 जानेवारी 2025 या कालावधीत चेतन शर्मा याने स्वतःच्या जीवनावश्यक आणि चैनीच्या वस्तूंवर तरुणीकडून तब्बल 58 लाख 30 हजार रुपये खर्च करवून घेतले. अशा प्रकारे, आरोपीने तरुणीची एकूण 65 लाख 30 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
तरुणीने चेतन याच्या वडिलांना आणि आईला संपर्क साधला असता, त्यांनीही पीडितेस उडवाउडवीची उत्तरे देत त्याच्याशी लग्न लावून देण्यास नकार देत शिवीगाळ केली. यामुळे या फसवणुकीत आरोपीच्या कुटुंबाचाही सहभाग असल्याचे तरुणीने सांगितले.
फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार चेतन शर्मा त्याचे आई-वडिल या तिघां विरुद्ध काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनिरी नंदिनी वारे करत आहेत.