जव्हार फाटा येथील नाल्याचा निचरा बंद  pudhari photo
पालघर

Palghar Flooding : जव्हार फाटा येथील नाल्याचा निचरा बंद

उड्डाणपुलाखालील अरुंद नाला व गाळ साचल्याने पूरस्थिती

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जव्हार फाटा परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून पूरस्थिती निर्माण झाली. मुख्य नाल्यात कचरा व गाळ साचल्याने पाण्याचा नैसर्गिक निचरा पूर्णपणे बंद झाल्याने हॉटेल, ट्रान्सपोर्ट कार्यालय तसेच एका आदिवासी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. महामार्गावरील जव्हार फाटा उड्डाणपुलाच्या मुंबई वाहिनीवरील सेवा रस्ता जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

मंगळवारी रात्री पासून मुसळधार पाऊस सुरु आहे.पावसामुळे जव्हार फाटा येथील मुख्य नाल्याचा प्रवाह बंद झाल्याने पाणी थेट नाल्या जवळच्या हॉटेल नंदा खानावळ आणि मसानदेवी ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात शिरले. पाण्यामुळे आतील जीवनावश्यक वस्तू, कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले आहे.

हॉटेल परिसरात पाणी शिरल्याने दोन कुत्रे आणि काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारात उभ्या असलेल्या दोन ट्रक इंजिनमध्ये पाणी शिरल्याने नादुरुस्त झाल्याची महिती ट्रान्सपोर्ट मालकाने दिली.

ट्रान्सपोर्ट कार्यालयालगत असलेल्या शेतकऱ्याचे, शांताराम पागी यांचे पेरणी केलेले बियाणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून संपूर्ण पेरणी वाया गेल्याने त्यांना पुन्हा नव्याने पेरणी करावी लागणार आहे. यामुळे आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र बॉक्स कलव्हर्टची मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.नाल्याचे रुंदीकरण केले नसल्याने यंदाही मोठे नुकसान झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हॉटेल मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT