Gladiolus Flower Farming Pudhari
पालघर

Gladiolus Flower Farming: ग्लॅडिओलस फुलशेतीतून शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची सुवर्णसंधी

कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या उपक्रमामुळे पालघर जिल्ह्यात फुलशेतीकडे वाढता ओढा

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्र आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना नव्या शेती पद्धतींची माहिती मिळावी आणि त्यांना अधिक उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्रात दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांतर्गत यावर्षी कृषी प्रक्षेत्रावर करण्यात आलेली ग्लॅडिओलस फुलांची लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

ग्लॅडिओलस हे लांब दांड्याचे आणि अत्यंत महत्त्वाचे व्यापारी फूलपीक आहे. एका दांड्यावर क्रमाने उमलणारी आकर्षक फुले हे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. विविध रंगछटा उपलब्ध असल्यामुळे फुलांच्या गुच्छासाठी तसेच सजावटीसाठी या फुलाला वर्षभर मोठी मागणी असते. ग्लॅडिओलस हे मुख्यतः रब्बी हंगामातील पीक असले तरी, आपल्या हवामानात कडक उन्हाळा आणि जोरदार पावसाचा काळ वगळता वर्षभर त्याची लागवड करता येते. फुलांना आकर्षक रंग येण्यासाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. थंड, कोरडे आणि कमी पावसाचे हवामान या पिकासाठी अनुकूल असून कडक उन्हाळा आणि मुसळधार पाऊस या पिकाला मानवत नाही.

ग्लॅडिओलस पासून फुले आणि कंद असे दोन्ही उत्पादन मिळत असल्याने जमीन निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे. सुपीक, पोयट्याची ते मध्यम-भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकासाठी योग्य ठरते. या पिकाच्या प्रमुख जातींमध्ये संसरे (पांढरा), यलोस्टोन (पिवळा), ट्रॉपीकसी (निळा), फुले गणेश (फिक्कट पिवळा), फुले प्रेरणा (फिक्कट गुलाबी), नजराणा (गर्द गुलाबी), पुसा सुहागन (लाल) आणि हंटिंग साँग (केशरी) या जातींचा समावेश आहे. लागवडीपूर्वी जमीन नांगरून व कुळवून भुसभुशीत करावी. हेक्टरला 50 ते 60 टन शेणखत मिसळून सरी-वरंबे तयार करावेत. त्याचबरोबर हेक्टरला 200 किलो स्फुरद व पालाश मातीत मिसळावे. सरीवर 45 बाय 15 सेंमी अंतरावर कंदांची लागवड करावी. काही ठिकाणी सपाट वाफ्यात 30 बाय 20 सेंमी अंतरावरही लागवड केली जाते. लागवडीसाठी 2 ते 3 इंच व्यासाचे, 30 ते 35 ग्रॅम वजनाचे, सारख्या आकाराचे आणि निरोगी कंद वापरावेत. हे कंद शीतगृहात किमान तीन महिने विश्रांती दिलेले असावेत.

योग्य व्यवस्थापन केल्यास प्रतिहेक्टर दीड लाख ते अडीच लाख फुलदांडे मिळू शकतात. फुलांची प्रतवारी करून प्रत्येकी 12 फुलदांड्यांची एक जुडी बांधावी. या जुड्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून बांबूच्या किंवा कागदी खोक्यात पॅक करून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवाव्यात. ग्लॅडिओलस पिकात मररोग किंवा कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. रोगट कंद लागवडीसाठी वापरल्यास उगवण होत नाही किंवा उगवलेली रोपे लवकर मरतात. त्यामुळे लागवडीसाठी नेहमी निरोगी कंद वापरणे आवश्यक आहे. कंदांवर कॅप्टन या बुरशीनाशकाची शिफारशीनुसार प्रक्रिया करावी. तसेच पाने खाणारी अळीही पिकाचे नुकसान करते. या किडीच्या प्रतिबंधासाठी फोरेट (10 जी) हेक्टरला 20 किलो प्रमाणात जमिनीत मिसळावे.प्रादुर्भाव दिसल्यास कार्बारील 10 टक्के पावडर हेक्टरला 20 किलो प्रमाणात सकाळी पिकावर धुरळावी.

ग्लॅडिओलसच्या बीजोत्पादनासाठी म्हणजेच कंद निर्मितीसाठी काळजी घ्यावी लागते. फुलदांडे काढल्यानंतर कंदांची वाढ सुरू होते, त्यामुळे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. दांडे काढताना चार पाने झाडावर ठेवावीत. ही पाने पिवळी पडून वाळू लागल्यावर काढावीत. पीक पूर्ण वाळल्यानंतर कंद खोदून काढावेत. वाढलेले कंद आणि छोटे कंद वेगळे ठेवावेत. छोट्या कंदांपासून पूर्ण कंद तयार होण्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागतो. कंद काढल्यानंतर ते दोन ते तीन आठवडे सावलीत वाळवावेत.नंतर रसायनाची प्रक्रिया करून कंद 3 ते 5 अंश सेल्सिअस तापमानात शीतगृहात साठवून ठेवावेत. हे कंद पुन्हा लागवडीसाठी वापरता येतात.

पालघर जिल्ह्यात ग्लॅडीओलस लागवडीस अनुकूल वातावरण आणि मुंबईसारखी बाजारपेठ नजीक असल्याने त्याचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा. कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळत असल्याने ग्लॅडीओलसची लागवड फायदेशीर ठरेल.
डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT