Gholvad Railway Station Pudhari
पालघर

Gholvad Railway Station: घोलवड स्थानकावर प्रवाशांची गैरसोय; प्लॅटफॉर्म लांबी वाढवण्याची मागणी

प्लॅटफॉर्म 3 व 4 लहान असल्याने अनेक डबे बाहेर; प्रवाशांना ट्रॅकवर उतरावे लागते

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : महाराष्ट्र-गुजरात सीमाभागातील पश्चिम रेल्वेच्या घोलवड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 यांची लांबी कमी असल्यामुळे प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्यानंतर अनेक डबे प्लॅटफॉर्मच्या बाहेर राहतात. परिणामी प्रवाशांना थेट रेल्वे ट्रॅकवर उतरावे लागते. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

घोलवड रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. मुंबई तसेच गुजरातकडे कामानिमित्त, शिक्षणासाठी आणि विविध कारणांसाठी मोठ्या संख्येने नागरिक या स्थानकाचा वापर करतात. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 ची लांबी कमी असल्याने गाड्यांचे सर्व डबे प्लॅटफॉर्मला लागत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना गाडीतून उतरतानाही आणि चढतानाही रेल्वे ट्रॅकवरून जावे लागते, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या मार्गावर नवीन गाड्या वाढवण्याकडेही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. प्रवाशांची संख्या वाढत असताना गाड्यांची उपलब्धता मर्यादित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या समस्येबाबत स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे परिसरात बंदर उभारणीसह विकासाच्या मोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात अशा लहान रेल्वे स्थानकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. स्थानकाचा विकास न झाल्याने तसेच गाड्यांची संख्या न वाढवल्याने स्थानिक प्रवाशांना रोजच्या प्रवासासाठी अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत.

घोलवड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 ची लांबी कमी असल्यामुळे अनेक डबे प्लॅटफॉर्मच्या बाहेर थांबतात आणि प्रवाशांना ट्रॅकवर उतरावे लागते. ही अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने तातडीने प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करावे तसेच या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवावी.
ॲड. तेजस काळे, घोलवड ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT