पालघर: पनीर सदृश्य चीज ॲनालॉग या खाद्य पदार्थाचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या रेस्टॉरंट, हॉटेल्स, केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ग्राहकांना पदार्थाचे खरे स्वरूप स्पष्टपणे सांगणे, बिलावर तसे नमूद करणे आणि मेन्यूकार्डवर योग्य माहिती देणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दुग्ध उत्पादनामुळे पनीर हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक मानला जातो. पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने त्याला विशेष पोषणमूल्य आहे. शाकाहारींसाठी तो उत्तम प्रथिनांचा स्रोत समजला जातो. मात्र, काही ठिकाणी पनीरसारखे दिसणारे चीज ॲनालॉग हे पदार्थ “पनीर” किंवा “चीज” या नावाने विकले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.
अन्न सुरक्षा व मानके विनियम 2011
नुसार पनीर हा केवळ दुधापासून तयार करण्यात आलेला हा पदार्थ आहे. तर डेअरी ॲनालॉग किंवा चीज ॲनालॉग हा पदार्थ दुधाच्या व्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून तयार केला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला तरी तो मात्र पनीर नाही.
ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी असे निदर्शनास आले आहे की, अनेक हॉटेल्स आणि फास्ट फूड केंद्रांमध्ये चीज ॲनालॉगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, मात्र ग्राहकांना त्याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे ग्राहक चुकीच्या समजुतीतून पदार्थ खरेदी करतात.
यापुढे अशा आस्थापनांनी काळजी घेणे आवश्यक
बिलावर “चीज ॲनालॉग” किंवा “डेअरी ॲनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे, मेन्यूकार्ड, डिस्प्ले बोर्ड किंवा ऑनलाइन मेन्यूवर योग्य माहिती देणे, पॅकेजिंग व लेबलिंगमध्ये भ्रामक माहिती न देणे,
आदी नियम पाळणे आवश्यक राहणार आहे. प्रशासनाने ग्राहकांनाही सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य माहिती मिळणे गरजेचे असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
पालघर जिल्ह्यातील हॉटेल्स , रेस्टॉरंट्स, केटरर्स, उत्पादक व पुरवठादारांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कठोर कारवाईचा इशारा अन्न व प्रशासनाचे उपायुक्त दत्ता साळुंखे यांनी दिला आहे.
तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक,
ग्राहकांची दिशाभूल झाल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.बिलावर “चीज ॲनालॉग” किंवा “डेअरी ॲनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे, मेन्यूकार्ड, डिस्प्ले बोर्ड किंवा ऑनलाइन मेन्यूवर योग्य माहिती देणे, पॅकेजिंग व लेबलिंगमध्ये भ्रामक माहिती न देणे, आदी नियम पाळणे आवश्यक राहणार आहे. प्रशासनाने ग्राहकांनाही सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य माहिती मिळणे गरजेचे असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.