Antyodaya ration card women saree pudhari photo
पालघर

Palghar News : अंत्योदय योजनेतील त्या साड्यांचा वापर शिवारातील कुंपणासाठी

Antyodaya ration card women saree : भूमिपुत्र एल्गार संघटनेकडून चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पालघर : अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना शासनामार्फत वितरित करण्यात आलेल्या मोफत साड्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. ग्रामीण व आदिवासी भागांतील महिलांनी या साड्या परिधान करण्याऐवजी शेतातील भाजीपाला आणि पिकांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपण म्हणून वापरण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे.

वितरित करण्यात आलेल्या साड्यांचे कापड अत्यंत पातळ व निकृष्ट दर्जाचे असून त्या नियमित वापरासाठी योग्य नाहीत. साडी वापरण्यायोग्य करण्यासाठी फॉल, पिको आणि ब्लाऊज शिवण यावर अतिरिक्त खर्च करावा लागत असला तरी साडीचा दर्जा समाधानकारक नसल्याची तक्रार महिलांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. साडी खरेदी प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी, पुरवठा आणि वितरण यांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गरीब व आदिवासी महिलांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या योजनेचा मूळ उद्देशच निकृष्ट दर्जाच्या साड्यांमुळे फोल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी महिलांनी साड्यांचा वापर वस्त्र म्हणून न करता शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी कुंपण म्हणून केल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT