

बोईसर : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पीक घेता यावे, ग्रामीण भागातील स्थलांतराला आळा बसावा आणि शेतीला बारमाही पाण्याचा आधार मिळावा, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सूर्या प्रकल्पाच्या कालवा व्यवस्थेची आज दुरवस्था झाली आहे. धामणी धरणात पाणी साठवले जाते; मात्र हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणारी कालवा व्यवस्था अनेक ठिकाणी जीर्ण, भगदाडांनी पोखरलेली आणि गळतीने त्रस्त झाली आहे. परिणामी एकेकाळी सुमारे 16 हजार हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट असलेल्या प्रकल्पाचे प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र काही काळ चार ते पाच हजार हेक्टरपर्यंत घसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरण हे पालघर जिल्ह्यातील प्रमुख पाटबंधारे प्रकल्पांपैकी एक आहे. धामणी धरणातून उजवा व डावा तीर कालव्यांच्या माध्यमातून पालघर आणि डहाणू तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्याची संधी मिळावी आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्माण होऊन स्थलांतर रोखले जावे, हा या प्रकल्पामागील प्रमुख हेतू होता. मात्र धरण उभारल्यानंतर पाणी शेतापर्यंत नेणाऱ्या कालव्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती कितपत झाली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांची दुरवस्था ही केवळ एका गावाची अथवा एका शाखेची समस्या नाही. हा पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचा, उत्पन्नाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. धरणातील पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कालवा व्यवस्थेचे संपूर्ण ऑडिट करण्याची गरज आहे. कोणत्या कालव्याची किती लांबी नादुरुस्त आहे, कुठे किती गळती होते, किती क्षेत्राला प्रत्यक्ष पाणी मिळते, किती क्षेत्र कागदावर सिंचनाखाली आहे आणि दुरुस्तीवर आजपर्यंत किती निधी खर्च झाला, याची पारदर्शक माहिती सार्वजनिक करण्याची गरज आहे.
धरण भरलेले असताना कालवा कोरडा आणि शेतकरी पाण्यासाठी हवालदिल, अशी परिस्थिती असेल तर कोट्यवधींच्या पाटबंधारे व्यवस्थेचा नेमका फायदा कोणाला? शासनाने कालव्यांच्या दुरुस्तीला गती देण्याबरोबरच भूसंपादनाचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, धोकादायक पुलांची पुनर्बांधणी करावी आणि सूर्या प्रकल्पाच्या संपूर्ण कालवा व्यवस्थेचे तांत्रिक व आर्थिक ऑडिट करून “मंजूर सिंचन क्षेत्र विरुद्ध प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र” याचा श्वेतपत्रिका स्वरूपात खुलासा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सिंचन क्षेत्रात घट
सूर्या प्रकल्पाच्या माध्यमातून पालघर, डहाणू आणि विक्रमगड तालुक्यातील सुमारे 14 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले होते. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना भाताबरोबरच दुबार पीक घेण्यास मदत झाली. मात्र कालव्यांची दुरवस्था वाढत गेल्याने अनेक ठिकाणी पाणी गळती होऊ लागली, कालव्यांना भगदाडे पडली आणि शेतीपर्यंत अपेक्षित प्रमाणात पाणी पोहोचणे कठीण झाले.
पाटबंधारे विभागाकडून कामे सुरू
सिंचन क्षेत्र पुन्हा वाढविण्यासाठी पालघर पाटबंधारे विभागाने नादुरुस्त कालव्यांचे मजबुतीकरण, काँक्रीट अस्तरीकरण आणि बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे हाती घेतली आहेत. मागील वर्षी सूर्या डावा तीर कालव्याच्या 13 किलोमीटर भागाचे तसेच उजवा तीर कालवा शाखा क्रमांक एकच्या 20 किलोमीटर भागाचे मजबुतीकरण व काँक्रीट अस्तरीकरण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.