पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेल्या चार दिवसांपासून प्रचंड वाहतूककोंडी सुरू असून, चौथ्या दिवशीही प्रवाशांना मोठे हाल सोसावे लागले. मुंबई मार्गिकेवर वसई हद्दीत वर्सोवा ब्रिज ते विरार फाट्यापर्यंत सुमारे 20 ते 25 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शाळेच्या 6 बस 9 तास एकाच जागी स्तब्ध झाल्या. यात विद्यार्थी, रुग्णवाहिका, वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे आता पालघर तुफान वाहतूककोंडीचे घर झाले आहे.
या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांसह सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. मुंबईतील मालाड येथील मदर तेरेसा शाळेच्या सहलीसाठी आलेल्या सहा बसमधील जवळपास 300 विद्यार्थी मंगळवारी (ता. 14) रात्री 6 ते बुधवारी पहाटे 3:30 वाजेपर्यंत तब्बल नऊ तास वाहतूककोंडीत अडकले होते. स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी तातडीने मदतीचा हात देत अडकलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना जेवणाची व्यवस्था केली.
वाहतूककोंडीमुळे वसई-विरार शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही परिणाम होत आहे.विरार उड्डाणपूल, नारिंगी, चंदनसार, माणिकपूर, सातिवली, वालीव, वसई फाटा, तुळिंज, संतोष भुवन, औद्योगिक वसाहतीकडे जाणारे मार्ग यासह शहरातील अंतर्गत मार्गावर कोंडी होऊ लागली आहे. रस्ते मार्गाचा वापर करून प्रवासी हे ये-जा करत असतात, परंतु शहरातील नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीचे नेमके कारण काय ?
ठाणे रस्त्यावरील गायमुख येथील रस्त्याच्या कामामुळे अवजड वाहने कामन, चिंचोटी, भिवंडीमार्गे वळविण्यात आली. वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे ही अवजड वाहने थेट महामार्गावर येत असल्याने गेल्या चार दिवसांपासून मुंबई मार्गिकेवर ही कोंडी होत आहे. अवजड वाहने इतर मार्गावरून वळवितांना अथवा बंदी असताना अधिसूचना काढताना पालघर आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वाहतूक पोलीस आणि पोलीस अधीक्षकांच्या सल्ल्याने समन्वय साधून निर्णय घेतला पाहिजे.
पालकमंत्र्यांनाही घ्यावा लागला रो-रोचा आधार
पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेत बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीत भाग घेण्यासाठी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई येथून निघालेला पालमंत्र्यांचा ताफा घोडबंदर येथे वाहतूक कोंडीत अडकला होता.घोडबंदर पासून पालघरची दिशेने प्रवास करताना वाहतूक कोंडीतुन मार्ग काढत असताना नियोजन समितीच्या बैठकिला पोहचू शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वसई फाट्यावरून वसईच्या दिशेने वळण घेतले.वसई आणि नालासोपारा शहरातुन येथून प्रवास करीत विरारची मारंबळ पाडा जेट्टी गाठली, जेट्टीतुन प्रवास करून टेंभी खोडावे येथून रस्त्या मार्गे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पालघर पूर्वेकडील शासकीय विश्राम गृहावर दाखल झाले.
आज जी परिस्तिथी उद्भवली ती मिस मॅनेजमेन्टचा प्रकार आहे. महामार्गावरील वाहतूक नियोजन करणाऱ्या यंत्रणांसोबत संवाद साधत चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. सातिवली ब्रिजच्या बाजूचा रस्ता मजबुत करण्यात आला पाहिजे. वाहतूककोंडी दरम्यान महिला आणि मुलांची गैरसोय टाळण्यासाठी मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्याच्या सूचना वसई विरार महापालिकेला देण्यात आल्या आहेत.गणेश नाईक, पालकमंत्री, पालघर जिल्हा.