खानिवडे: उत्सवप्रिय देश म्हणजे जगभरातील देशांमध्ये भारताचे नाव सर्वात अग्रस्थानी आहे. फार मोठ्या उत्साहात भारतीय नागरिक सण साजरे करतात.मात्र हे साजरे होणारे सण लघुउद्योग, महिला बचतगट व कारागीरांना हंगामी रोजगाराची संधी या निमित्ताने निर्माण करून देतात.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर आताच साजरे झालेले गौरी गणपती उत्सवात व दसर्यात , मूर्ती कारागीर, हार तुरे, फुले पाने , मिठाई, महिला बचत गटांच्या पारंपरिक घरगुती पाककृती चे खाद्यपदार्थ, फरसाण, दुधासह दुग्धजन्य पदार्थ , विणकर, कपडेलत्ते , दागदागिने आणि अश्या इतर सर्वांना रोजगाराची संधी मिळते.यामध्ये गोरगरीब शेतकरी आदिवासी यांना शेतमालासह राना वनातील उपज विक्रीतून रोजगार मिळतो.
भारतातील सण-उत्सव हे केवळ धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे नसून रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे साधन ठरत आहेत. दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र, होळी, ईद, ख्रिसमस अशा सणांच्या काळात बाजारपेठा उजळून जातात. त्यामुळे लघुउद्योग, महिला बचतगट, कारागीर, हस्तकला व्यवसाय तसेच युवकांना हंगामी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.
शहरासह ग्रामीण भागातही विविध हंगामी वस्तूंच्या विक्रीतून महिलांना संधी उपलब्ध होत आहे. सणांपूर्वीपासूनच कपडे, दागिने, मिठाई, सजावटीचे साहित्य, फटाके, खेळणी, भेटवस्तू आदी वस्तूंची खरेदी वाढते. त्यामुळे उत्पादन आणि विक्री क्षेत्रात हजारो नवीन हातांना काम मिळते.
विशेषतः ग्रामीण भागातील हातमाग, मातीच्या मूर्ती, रांगोळी साहित्य, फुलांची माळ, पारंपरिक सजावट करणार्या कारागिरांना या दिवसात मागणीचे पीक येते. रोजगार व कौशल्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सणासुदीच्या काळात हंगामी रोजगाराची मागणी तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढते. यामुळे अनेक युवक आणि कामगारांना तात्पुरतेच का होईना पण आर्थिक दिलासा मिळतो. तज्ज्ञांच्या मते, सणांचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व जितके मोठे आहे तितकेच ते अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरत आहेत. त्यामुळे “सण म्हणजे आनंदाबरोबर रोजगार व अर्थव्यवस्थेला बळ“ हे समीकरण अधिकाधिक दृढ होत चालले आहे.
महिला बचत गटांसाठी सुर्वणसंधी
महिला बचतगटांसाठीही सण म्हणजे रोजगाराची सुवर्णसंधी ठरते. फराळाचे पदार्थ, मेणबत्त्या, भेटवस्तू पॅकिंग, सजावटीच्या वस्तू, पेपर बॅग, तयार करण्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसतो. यामुळे स्वावलंबनाच्या दिशेने महिलांचे पाऊल अधिक मजबूत होताना या निमित्ताने दिसत आहे.