Dongariwadi water springs Pudhari
पालघर

Dongariwadi water springs: डोंगरीवाडीत उगम पावलेल्या झऱ्यांचे रहस्य उलगडले; दैवी चमत्काराच्या अफवांना पूर्णविराम

पावसाचे व फार्महाऊसचे मुरलेले पाणी कारणीभूत; भूजल तज्ञांच्या अहवालातून स्पष्टता

पुढारी वृत्तसेवा

किन्हवली : शहापूर तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील डोंगरीवाडी या आदिवासी कातकरी समाजाच्या पाड्यावर मागच्या आठवड्यात अचानक जमिनीतून पाण्याचे झरे सुरु झाल्याची घटना चर्चेचा विषय बनली होती. या झऱ्यांच्या उगमामागे काहीतरी दैवी चमत्कार किंवा भुगर्भातील अंतर्गत हालचाली कारणीभूत असाव्यात असे सांगितले जात असताना बाजूलाच टेकडीवर असलेल्या एका फार्महाउसच्या बागेत मुरणारे पाणी तसेच उशिरापर्यंत पडलेल्या पावसाचे मुरलेले पाणी खाली उतारावरून सपाट जमिनीवर बाहेर निघत असल्याची बाब समोर आल्याने 10 दिवसांपासून सुरु असलेल्या अफवांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

मागच्या 10 दिवसांपूर्वी नडगाव(सो) ग्रामपंचायतमधील डोंगरीवाडीत अचानकपणे पाण्याचे झरे उगम पावल्याची बातमी तालुक्यात पसरली होती. जेथे चारशे फूट खोल बोअरवेलला पाणी लागत नाही, तेथे सपाट व उतारावराच्या जमिनीतून शुद्ध पाण्याचे झरे वाहू लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अगदी पाण्याची मोटर लावूनही पाणी कमी होत नसल्याने काहीतरी दैवी चमत्कार झाला आणि कोरड्या जमिनीला पाणी फुटले अशी बातमी सर्वदूर पसरली. माहिती मिळताच पळसोली गावचे पोलीस पाटील किरण खंडागळे, सरपंच जयवंत वाघ, दाजी वाघ, शिवाजी वाघ, माजी पं स. सदस्य सुभाष हरड, बाजार समिती संचालक सुनिल धानके, महेश पतंगराव, अशोक सपाट यांसह शहापूर पं.स.गटविकास अधिकारी राठोड, एपीआय नितीन खैरनार यांनी भेट देऊन पाहणी केली होती

यावेळी भुगर्भ तज्ञाकडून तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली होती.अखेर कोकण विभाग भुजल तज्ञ डॉ.रमेश गुडप्पू व ठाणे विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.लौकिक कदम यांनी जागेवर येऊन पाहणी केल्यानंतर या झऱ्यांचे रहस्य उलगडले आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या हैड्रोलॉजिकल सर्वे रिपोर्टनुसार पावसाळा संपल्यानंतरही 2 महिने पडलेल्या अधिकच्या पावसाचे पाणी जमिनीत मुरून जेथे सखल जागा मिळेल तेथून बाहेर पडत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बाजूला टेकडीवर असलेल्या बागडी फार्ममध्ये आंब्याच्या रोपांना सतत सव्वा महिना पाणी दिले जात होते.

ते पाणी जमिनीत मुरून खाली उताराला झऱ्याच्या रूपाने बाहेर पडत असल्याची बाब समोर येत आहे. कारण आंब्याच्या रोपांना पाणी देणे बंद झाल्यावर खाली उताराला व शेतात उगम पावलेले झरेही बंद झाले होते अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.दरम्यान पोलीस पाटील किरण खंडागळे यांनी या घटनेचे रहस्य उलगडण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दै.पुढारीशी बोलतांना दिली.

डोंगरीवाडीतील झऱ्यांचे पाणी हे पावसाचे सिपेज (मुरलेले)वॉटर आहे. जमिनीतील अतिरिक्त पाणी दाबामुळे जेथे कमकुवत जमीन आहे तेथे बाहेर पडत आहे. ते काही दिवसांनी बंद होईल.
श्री.लौकिक कदम, प्र.वरिष्ठ भुवैज्ञानिक, ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT