ठळक मुद्दे
रस्त्याच्या पॅचवर्क पाहणीदरम्यान आमदार दुबे पंडीत यांची दत्तानी मॉल परिसराची पाहणी
पाहणी दरम्यान परिसरात मध्यरात्रीनंतर अवैधरित्या बार सुरू
दत्तानी मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण सुरु असल्याचे चित्र
वसई (पालघर) : शहरात अवैध्यरित्या सुरू असलेल्या बारवर आमदारांनी रविवार (दि.24) मध्यरात्री धडक कारवाई केल्याने बारचालकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान शहरात विविध समस्यांवर उपायोजणांसाठी आमदार स्नेहा दुबे पंडीत अॅक्शन मोडवर असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या पॅचवर्क पाहणीदरम्यान रविवार (दि.24) पहाटे 2.35 वाजता आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी वसई (पश्चिम) येथील दत्तानी मॉल परिसराची पाहणी केली. यावेळी त्या परिसरात मध्यरात्रीनंतर अवैधरित्या सुरू असलेल्या दोन बार वर कारवाई करण्याच्या सूचना आमदार दुबे पंडित यांनी पोलिसांना दिल्या.
दत्तानी मॉलमधील विंग्स ऑन फायर बार व पंखा फास्ट बार येथे मोठा डिजेचा आवाज, तसेच मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण सुरू असल्याचे यावेळी दिसून आले. स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही मध्यरात्री 2.30 वाजता हे बार कायदा मोडून सर्रासपणे सुरू असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. या संदर्भात आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी संबंधित पोलिस अधिकार्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. आमचा कोणत्याही व्यवसायाला विरोध नाही, मात्र कायदा मोडून रात्री 2.30 नंतर चालणार्या बारविरोधात कारवाईची आमची भूमिका ठाम असेल, असे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी स्पष्ट केले.