

मिरा रोड : मिरा-भाईंदर शहरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार सुरू आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त निकेत कौशिक व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी या डान्स बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीसांनी ऑर्केस्ट्रा बार च्या नावाखाली सुरू असलेल्या डान्सबार वर कारवाई केली.
या कारवाईत 18 मुली सापडल्या असुन 36 लोकांवर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एक लाख एक हजार रुपयाचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त केली आहे. बारवर पोलीसांनी छापा टाकल्यानंतर उपस्थित असलेले बार मालक व चालक या गुन्ह्यात फरार दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मीरा-भाईंदर शहरात तत्कालीन पोलीस आयुक्त मधुकर पांडे असताना पहाटेपर्यंत डान्स बार सुरू असल्याचे दिसत होते. या डान्स बार मुळे मीरा-भाईंदर शहर बदनाम झाले आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी डान्स बार वर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करत शहरात सुरू असलेल्या बेकायदा धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. गेल्या काही दिवसांत पोलीसांनी बारवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधलेल्या केम-छो बार चालक यांनी सर्रासपणे डान्स बार सुरू ठेवल्याचे आढळून आले आहे.
बार चालक यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून बारमध्ये मोठया प्रमाणात मुली ठेवत डान्स सुरूच ठेवला होता. काशीमीरा येथील केम-छो डान्स बार मध्ये मोठ्या प्रमाणात मुली असल्याची व त्यांच्याकडून डान्स सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक शाखा भाईंदर यांच्या माध्यमातून सापळा रचून केम-छो या डान्स बार धाड टाकली.
यावेळी 18 मुलींना तोकडे कपडे व उत्तान कपडे परिधान करून अश्शील नृत्य करताना मिळून आल्या आहेत. कारवाई करत 1 लाख 1 हजार 770 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच 36 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.