

ठाणे : ठाणे शहरात बारमध्ये छम छम सुरू असल्याचा प्रकार वर्तकनगर मधील एका बारवर केलेल्या कारवाईवरून समोर आला आहे. टोपाझ नावाच्या बारमध्ये म्युझिक सिस्टमवर अंगप्रदर्शन करून अश्लिल नृत्य करणार्या महिलांवर काही ग्राहक पैसे उडवताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात बार मॅनेजर शिवप्रसाद शेट्टी सह 3 वेटर आणि 28 गायक आणि डान्सर्स महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासह पळून गेलेल्या 10 ते 15 ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोपाझ बार या ठिकाणी काही महिला अंगप्रदर्शन करून अश्लील नृत्य करत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वागळे इस्टेट परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या आदेशानुसार कापूरबावडी आणि चितळसर या पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्या बारच्या ठिकाणी छापा टाकला असताना, अश्लील नृत्य करणार्या महिलांवर काही ग्राहक पैशांची उधळण करताना दिसून आले. ही कारवाई तक्रारदार पोलिस उपनिरीक्षक डोंबाळे यांच्यासह पोलीस हवालदार राकेश भोर, पोलीस शिपाई योगेश चितळे, पोलीस शिपाई रेश्मा शिंदे या पथकाने केली. ताब्यात घेतलेल्या 28 महिलांपैकी दहा महिला सिंगर्स असून त्या म्युझिक सिस्टमच्य गाण्याच्या तालावर अश्लील नृत्य करताना एकमेकांच्या शरीराशी लगट करत असल्याचे कारवाईत समोर आले.
ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑर्केष्ट्रा बार, लेडीज बार आणि डान्सबार न्यायालयाच्या आणि पोलिसांच्या नियमांच्या विरोधात राजरोसपणे वेळेचे बंधन न पाळता सुरु असल्याचे बोलले जात आहे. ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये सुरु असलेल्या टोपाझ बारवर परिमंडळ-5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या आदेशाने कापूरबावडी आणि चितळसर या पोलिस ठाण्यातील पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे चार भिंतीच्या आतील अश्लीलता आणि अनियमितता चव्हाट्यावर आली. मात्र ही अनियमितता सर्रासपणे ठाण्यात सुरु आहे. ठाण्यात बार, लेडीज बार, डान्सबार नियमांच्या अधीन राहून चालत नाहीत तर पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून बोटावर मोजण्या इतकेच बार व्यतिरिक्त सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून बार मोठ्या प्रमाणात चालत आहेत. या सर्व बारवर कारवाई करून बेछूट आणि मस्तवाल बार चालकांना धक्का देण्याची गरज असल्याची नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.