Palghar Waghadi House Fire File Photo
पालघर

Palghar news: दिवाळीच्या दिवशीच संसाराची राखरांगोळी! वाघाडीत आदिवासी कुटुंबाचे घर आगीत जळून खाक

डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील भीमबांध परिसरातील एका आदिवासी घराला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून, घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

पुढारी वृत्तसेवा

Palghar news

कासा : पुढारी वृत्तसेवा

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण! मात्र, याच सणाच्या काळात डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील भीमबांध परिसरातील एका आदिवासी कुटुंबाच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. बुधवारी (दि. ११) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास जानकी बसवत यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून, घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी तसेच दैनंदिन वापरातील सर्व संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दुर्घटनेत कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

दिवाळीनिमित्त सर्वत्र घराघरांत दिव्यांची रोषणाई, फराळाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असताना वाघाडीच्या भीमबांध परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दुपारच्या सुमारास जानकी बसवत यांच्या घराला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. घरातून आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांनी उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने काही वेळातच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. घरातील साहित्य बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे धान्य, कपडे, भांडी आणि कष्टाने उभा केलेला संसार क्षणार्धात राखेत बदलला. सुदैवाने, आग लागली त्यावेळी घरात कुटुंबातील कोणतीही व्यक्ती उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

अग्निशमन दल पोहोचेपर्यंत घराची राखरांगोळी

घटनेची माहिती मिळताच डहाणू अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, वाघाडी हे डहाणूपासून सुमारे २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असल्याने अग्निशमन दलाच्या वाहनाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला. तोपर्यंत आगीने संपूर्ण घर आणि घरातील साहित्य जाळून टाकले होते. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत घराची मोठ्या प्रमाणात राखरांगोळी झाली होती. ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांनंतर आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत बसवत कुटुंबाच्या हाती उरला होता तो केवळ जळालेल्या घराचा ढिगारा.

जानकी बसवत यांच्या कुटुंबाने मोठ्या कष्टाने उभा केलेला संसार या आगीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. घरातील अन्नधान्य जळून गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर कपडे, भांडी आणि जीवनावश्यक वस्तू नष्ट झाल्याने दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले आहे. आधीच आर्थिक परिस्थितीशी झुंज देणाऱ्या या आदिवासी कुटुंबावर दिवाळीच्या सणातच मोठे संकट ओढवले आहे. सणाच्या दिवशी घरात दिवे लावण्याऐवजी या कुटुंबाला जळालेल्या घराच्या राखेतून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मंजूर करावी. तसेच, घराची पुनर्बांधणी होईपर्यंत तात्पुरता निवारा, अन्नधान्य, कपडे, भांडी आणि इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

दिवाळीच्या प्रकाशोत्सवात एका गरीब आदिवासी कुटुंबाचा संसार आगीत भस्मसात झाल्याने केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही, तर प्रशासनाने प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनीही या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. संकटाच्या या काळात बसवत कुटुंबाला पुन्हा उभे करण्यासाठी समाजाने माणुसकीचा हात पुढे करण्याची गरज आहे, अशा भावना परिसरातून व्यक्त होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT