

पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर तालुक्यातील वरई उड्डाणपुलाच्या गुजरात वाहिनीवरील उताराचा भाग दिवसेंदिवस अपघातांचे केंद्र बनत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत या परिसरात दहाहून अधिक अपघात घडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा उतार आता मृत्यूचा सापळा ठरू लागल्याची भीती व्यक्त होत आहे.
१५ सप्टेंबर रोजी याच ठिकाणी ट्रकचा निखळलेला टायर थेट महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक यादव बोराडे यांना धडकला होता. या भीषण घटनेत गंभीर जखमी झालेल्या बोराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
या घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे समोर आला होता. मात्र, त्यानंतरही अपघातांची मालिका थांबलेली नाही. शुक्रवारी झालेल्या दुहेरी अपघातात एक ट्रक जळून खाक झाला.दोन दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या उतारालगत असलेल्या वांद्री नदीवरील पुलावर तिहेरी अपघात घडला. या घटनांमुळे वरई उड्डाणपुलाचा उतार आणि त्यालगतचा परिसर वाहनचालकांसाठी धोकादायक बनल्याचे स्पष्ट होत आहे.
वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वरई उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गीकेवरील उताराचा भाग अपघातप्रवण क्षेत्र घोषित करून वाहनांची वेगमर्यादा कमी करावी, पुरेशा अंतरावर सूचना फलक, वेग नियंत्रक उपाययोजना आणि आवश्यक सुरक्षा यंत्रणा उभारण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
महार्गावरील जीवघेणा अपघात घडण्यापूर्वी महामार्ग प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.