Palghar Mahalaxmi Temple Festival pudhari photo
पालघर

Palghar Mahalaxmi Temple Festival : डहाणूतील महालक्ष्मी मंदिरात बारसी उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी

नवीन धान्यासह विविध भाज्यांचा देवीला नैवेद्य; गुजरात, दमण, सेलवासमधूनही भाविकांची मोठी उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

कासा : डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात बुधवारी पारंपरिक दिवाळ बारसी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. बारसी उत्सवानिमित्त पहाटेपासूनच महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी तसेच देवीला आपल्या शेतातील नवीन पिकांचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. डहाणू तालुक्यासह गुजरात, दमण, सिल्वासा आदी भागांतूनही मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाले होते.

महालक्ष्मी देवीला परिसरातील आदिवासी बांधवांसह स्थानिक नागरिकांकडून कुलदेवता मानले जाते. त्यामुळे बारसी उत्सवाला या परिसरात धार्मिक तसेच पारंपरिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या बारसीच्या दिवशी पावसाळ्यात शेतात उत्पादित झालेल्या नवीन धान्यासह विविध पिकांचा पहिला नैवेद्य देवीला अर्पण करण्याची येथील परंपरा आहे. या दिवशी शेतात उत्पादित झालेले नवीन भात, काकडी, भोपळा, चवळी, दुधी भोपळा, गिलका तसेच विविध फळभाज्या व अन्य पिके देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केली जातात. देवीला नैवेद्य दाखवल्यानंतरच या नवीन पिकांचे सेवन करण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आजही जपली जाते.

नैवेद्य अर्पण केल्यानंतर भाविक उपवास सोडतात. त्यामुळे बारसी उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता शेतकरी जीवन, निसर्ग आणि आदिवासी कृषीपरंपरेशी जोडलेला उत्सव म्हणूनही महत्त्वाचा मानला जातो. उत्सवानिमित्त मंदिर परिसराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. सकाळपासून महिलांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

अनेक महिला डोक्यावर नवीन धान्य व शेतातील भाजीपाला घेऊन पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मी देवीच्या चरणी नैवेद्य अर्पण करण्यासाठी आल्या होत्या.बारसी उत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही एक दिवसाची जत्रा भरली. परिसरात विविध प्रकारची छोटी-मोठी दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. लहान मुलांनीही जत्रेचा आनंद घेतला.उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील पारंपरिक सांस्कृतिक परंपरांनाही उजाळा मिळतो.

तारपा नृत्य, गौरी नृत्य, गरबा यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आदिवासी समाजाच्या पारंपरिक कलांचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमांमुळे उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व अधिक अधोरेखित होते. महालक्ष्मी मंदिराच्या बारसी उत्सवाला डहाणू तालुक्यासह पालघर जिल्ह्याच्या विविध भागांतून भाविक येतात. त्याचबरोबर शेजारील गुजरात राज्य, दमण आणि सिल्वासा परिसरातूनही मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे बारसीच्या दिवशी मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची वर्दळ असते.

शेतात पिकविलेल्या नवीन धान्याचा आणि भाजीपाल्याचा पहिला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करून नंतरच त्याचे सेवन करण्याची ही परंपरा पिढ्यांपासून सुरू आहे. बदलत्या काळातही ही परंपरा श्रद्धेने जपली जात असल्याने मंदिरातील बारसी उत्सवाला धार्मिकतेबरोबरच आदिवासी संस्कृती आणि कृषीपरंपरेचा अनोखा संगम लाभला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT