

माथेरान : मिलिंद कदम
माथेरानमध्ये मागील अनेक दिवसांपासून येथील विविध प्रभागांमध्ये पालिका प्रशासन व रेल्वे प्रशासन यांच्यामार्फत विविध जागांचे मोजणी केली जात आहे व रेल्वे प्रशासनाने माथेरानमध्ये अनेक जागा स्वतःच्या मालकीच्या ठळक त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत तर नगरपालिका प्रशासनाकडून ही कारवाईचे संकेत मिळत असल्याने माथेरानकरांची चिंता वाढली आहे.
माथेरानमध्ये नगरपालिका प्रशासन अनेक दिवसांपासून येथील विविध भागांमध्ये बंगलो प्लॉट व बाजार प्लॉट यांच्या जागांचे मोजणी करीत आहे. हरित लवादामध्ये सुरू असलेल्या सुनावणीचा हा एक भाग असल्याचे समजते.
या मोजणीचा दुष्परिणाम येतील प्रत्येक स्थानिकाला सोसावा लागणार आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून माथेरानच्या डेव्हलपमेंट प्लान राबविण्यात आलेला नाही त्यामुळे येथील अनेक वर्षापासून राहणाऱ्या स्थानिकांना कायदेशीर रित्या अनधिकृत ठरविण्यात आलेले आहे व या लोकांची बाजू मांडण्यास कोणीही राजकीय पक्ष थेट समोर आलेला नाही. या उलट राजकीय पक्षांच्या अति महत्वकांक्षामुळेच माथेरानकरांना आजही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
माथेरानमध्ये मालवाहतूक सेवा अस्तित्वात नसल्याने येथे घर बांधणे म्हणजे दिव्य असते. प्रत्येक गोष्टीला अवाच्या सव्वा पैसे खर्च करून येथे राहणारा गरीब आपले घर बांधत असतो, परंतु अशा कारवाईमुळे अनेकांचे स्वप्न उध्वस्त होणार आहे.
माथेरानमध्ये स्वर्गीय आदमजी पीर बॉय यांनी स्वखर्चाने मिनी ट्रेन सुरू केली होती, हे सर्वांनाच माहित आहे स्वखर्चाने याकरिता जमिनी खरेदी करून हा प्रकल्प त्यांनी सुरू केला होता. काही काळानंतर त्यांनी तो रेल्वेकडे सुपूर्त केला परंतु त्या अगोदर माथेरान नगरपालिका अस्तित्वात आली होती व नगरपालिकेने येतील स्थानिकांना राहण्याकरता बाजार प्लॉट व बंगलोधारकांना वेगळे प्लॉट अशी रचना केली होती परंतु आता रेल्वे प्रशासनाने या जागांवरच हक्क जाहीर करून या लोकांना ताबडतोब जागा खाली करण्याच्या नोटीस जारी केले आहे. यांची संख्या एकूण ४४ प्लॉट धारक आहे, ज्यामध्ये नगरपालिकेच्या स्वतःच्या मालमत्ताचाही उल्लेख आहे.
त्याचप्रमाणे बाजार प्लॉट ही स्वतःच्या मालकीचे आहेत असे दर्शविण्यात आले आहे. माथेरान प्रवेशद्वाराहून बाजारपेठेकडे येणारा रस्त्याचा काही भाग आहे त्यामध्ये दाखविण्यात आला असून त्या बाजूला नगरपालिकेने दिलेले गाळे यांचाही समावेश असल्याचे समजते. त्यामुळे या कारवाईमुळे अनेकांना रस्त्यावर यावे लागणार असून नगरपालिका प्रशासनाबरोबर रेल्वेने अनेक वेळा पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांना योग्य ते उत्तर मिळेल नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून समजते. त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारचे नोटीस जारी केली असून लवकरच कारवाईचा बडगा उभारण्यात येणार असल्याचे काही रेल्वे अधिकारी खाजगीत बोलत आहेत.
नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून घरांचे मोजमाप
आतापर्यंत माथेरानमध्ये झालेल्या कारवाईपैकी ही सर्वात मोठी कारवाई असणार असून ज्यामुळे माथेरानमधील अनेकांचे अस्तित्वच नष्ट होणार आहे. अनेकांना या कारवाईमुळे रस्त्यावरती यावे लागणार असून नगरपालिका प्रशासन अजूनही शांतच असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी घरोघरी जाऊन मोजमाप घेत असल्याने नगरपालिका प्रशासनाचाही या सर्व कारवाईला संमती असल्याचेच दिसून येत आहे. माथेरानमध्ये अशावेळी खंबीर नेतृत्व आणि समोर येऊन लढा देण्याची गरज असून नेमके अशा वेळी याची उणीव माथेरानकरांना भासत आहे, त्यामुळे वाली नसलेल्या माथेरानकरांना आगामी काळ कठीण असणार आहे.