Gharkul Yojana |  pudhari photo
पालघर

Dahanu Housing Scheme: डहाणूत घरकुल घोटाळा उघड; अधिकाऱ्यावर शिस्तभंग कारवाई

शबरी आवास योजनेत गैरप्रकार; पक्के घर असूनही मंजुरी, वेतनवाढ रोखली

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : डहाणू तालुक्यातील दाभोण ग्रामपंचायतीत शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजुरी प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाल्यानंतर प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. चुकीच्या पद्धतीने घरकुल मंजूर झाल्याची तक्रार समोर आल्यानंतर चौकशी करण्यात आली असता लाभार्थ्याकडे आधीच पक्के घर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रस्तावाची योग्य छाननी न केल्याचे निदर्शनास आल्याने अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

दाभोण ग्रामपंचायतीतील रामा लाडक्या सातवी यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले होते. ग्रामसभेची मान्यता घेऊन नियमानुसार लाभार्थी निवड करण्यात आली होती. त्यानुसार 16 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता म्हणून 15 हजार रुपये जमा करण्यात आले होते. मात्र, भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचे डहाणू तालुका कमिटी सदस्य शिवप्रसाद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित लाभार्थ्याच्या नावावर वाणगाव येथे आधीच पक्के घर असल्याचे समोर आले.

या तक्रारीनंतर प्रशासनाने सखोल चौकशी केली असता सदर बाब सत्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित लाभार्थ्याची घरकुल मंजुरी रद्द करण्यात आली. तसेच, त्यांनी 28 मे 2025 रोजी शासनाकडे मिळालेला पहिला हप्ता परत जमा केला आहे. या प्रकरणात त्या काळात दाभोण ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी गुरुनाथ वारघडे यांनी प्रस्ताव सादर करताना आवश्यक ती पडताळणी न केल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील अधिनियम 3 चा भंग झाल्याचे आढळून आल्याने संबंधित अधिकाऱ्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2026 मधील त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारदाराच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली असली तरी अशा प्रकारच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, शासनाची दिशाभूल करून योजनांचा गैरफायदा घेणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT