Clay Pot Water Cooling Pudhari
पालघर

Clay Pot Water Cooling:आधुनिक फ्रिजलाही टक्कर देणारी मातीची मडकी; मुरबाडमध्ये पारंपरिक ‘कूलिंग’ची वाढती क्रेझ

उन्हाळ्यात नैसर्गिक थंड पाण्यासाठी मडक्यांची मागणी वाढली; पर्यावरणपूरक पर्यायाकडे नागरिकांचा कल

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर : किशोर गायकवाड

उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रत्येक घरात गार पाण्याची गरज तीव्र होते. कडक उन्हात घशाला दिलासा देणारे थंडगार पाणी म्हणजे जणू जीवनदायीच. आधुनिक काळात इलेक्ट्रॉनिक फ्रिज सहज उपलब्ध असले तरी, नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड करणाऱ्या मातीच्या मडक्यांची ओढ आजही कायम आहे. मुरबाडच्या बाजारपेठेत दिसणारी ही पारंपरिक ‌‘फ्रिज‌’ संस्कृती अजूनही श्वास घेत असल्याचं चित्र समोर येत आहे.

शहरातील कुंभार आळी येथील वैशालीताई विनायक कुंभार यांचे कुटुंब गेली सहा ते सात वर्षे पिढीजात व्यवसाय जपत मातीच्या भांड्यांची विक्री करत आहे. त्यांच्या छोट्याशा हातगाडीवर ठेवलेली विविध आकारांची मडकी, रांजण, लहान चुली, पणत्या, गुल्लक, न्हाणी, तसेच पक्ष्यांसाठी पाण्याची पात्रे, रंगीबेरंगी शोभेची भांडी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. फोटोमध्ये दिसणाऱ्या मडक्यांना लावलेले प्लास्टिकचे नळ, आकर्षक रंगकाम आणि मजबूत बांधणी ही या पारंपरिक भांड्यांची आधुनिक रूपं आहेत. एका मडक्यात सुमारे एक ते दीड दुडी इतकं पाणी साठवता येतं आणि 250 रुपयांपासून त्यांची विक्री केली जाते. तर मोठे रांजण 850 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

मातीच्या मडक्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सूक्ष्म छिद्रांमुळे पाणी नैसर्गिकरीत्या थंड होतं. हे पाणी केवळ थंडच नसून आरोग्यासाठीही हितकारक मानलं जातं. प्लास्टिक किंवा स्टीलच्या भांड्यांपेक्षा मडक्यातील पाणी अधिक गोड आणि ताजं वाटतं, असा अनुभव अनेक ग्राहक सांगतात. विशेष म्हणजे, विजेची गरज नसल्याने हे ‌‘फ्रिज‌’ पर्यावरणपूरकही ठरते.

व्यवसायासमोरील अडचणी...

पूर्वी उन्हाळ्यात मडक्यांना मोठी मागणी असते, तर पावसाळ्यात ग्रामीण भागात चुलींची मागणी वाढते. सध्या एलपीजी गॅस टंचाईमुळे पुन्हा चुलींची मागणी वाढल्याचेही विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या व्यवसायासमोर काही अडचणीही आहेत. माती, रंगसाहित्य आणि वाहतूक खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच भांड्यांची तुटफूट ही मोठी समस्या आहे. बाजारात एकसारखा दर नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि विक्रेत्यांना नुकसान सहन करावं लागतं, अशी खंत व्यापारी व्यक्त करतात.

इतिहासजमा होण्याची भीती...

एकीकडे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक फ्रिजच्या वाढत्या वापरामुळे मातीची मडकी हळूहळू इतिहासजमा होत असल्याचं चित्र दिसत असलं, तरी दुसरीकडे नैसर्गिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून या पारंपरिक ‌‘फ्रिज‌’चे नैसर्गिक गुणधर्म आजही कमी झालेले नाही. उन्हाळ्याच्या कडक तापमानात, गार पाण्याचा खरा आस्वाद घ्यायचा असेल, तर मातीच्या मडक्याला पर्याय नाही; ही जाणीव पुन्हा एकदा मुरबाडच्या बाजारपेठेतून ठळकपणे समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT