

नालासोपारा : विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परीसरात एका इमारतीच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहाणी झाली नसून एका सदनिकेत अडकलेल्या 9 जणांची सुखरुप सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. तसेच काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले.
विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरात शारदा हाईटस इमारतीच्या आठव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे रविवारी रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे मोठी खळबळ उडाली. आगीच्या तीव्रतेमुळे मजल्यावर धुराचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.
स्थानिकांनी या घटनेची माहिती तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. आगीमुळे रूम क्रमांक 805, 806 आणि 807 मधील नागरिक अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दोन अग्निशमन गाड्या दाखल झाल्यानंतर जवानांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. काही वेळआतच अडकून राहिलेल्या नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. व त्यानंतर तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. शॉट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीच्या दुर्घटनेमुळे इमारतीमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अग्निशमन अधिकारी विजय राणे यांच्या माहितीनुसार, या आगीत एकूण 9 नागरिक अडकले होते. मात्र जवानांनी वेळीच कारवाई करत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.“आम्हाला सकाळी आगीची माहिती मिळताच तात्काळ दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तीन रूममध्ये एकूण 9 जण अडकले असल्याचे समजले. आमच्या पथकाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.