केळवे रोड ः जलसार विराथन बुद्रुक टेंभीखोडावे या ग्रामपंचायत हद्दीत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मेघराज डोंगरातून भुयारी बोगदा तयार करण्यासाठी सुरुंग स्फोट केला जातो. या स्फोटामुळे या भागातील 500 पेक्षा जास्त पक्क्या घरांना भेगा जाऊन घरमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत या भागातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने प्रखर विरोध दर्शवल्यावर पालघर येथील जिल्हा कार्यालयात बुलेट ट्रेन प्रकल्पातील ब्लास्टिंग संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व बाधित घरमालक शेतजमीन मालक व शासकीय अधिकारी आणि एल अँड टी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
आठ दिवसा आधी पार पडलेल्या या बैठकीत सर्व अधिकारी व कंपनी प्रतिनिधींनी जलसार किरईपाडा विराथन बुद्रुक टेंभीखोडावे येथील उपस्थित व जमलेल्या ग्रामस्थांना बाधित घराचे सर्वेक्षण थर्ड पार्टीमार्फत न करता शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येईल. तसेच प्रत्येक घराचे पूर्ण स्ट्रक्चरल अपडेट करून त्यानुसार योग्य मोबदला लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन या जिल्हास्तरीय गठित बैठकीत देण्यात आले होते. मात्र शनिवारी सकाळी या भागातील ग्रामस्थांना व ग्रामपंचायतींना कोणती सूचना व लेखी पत्र न देता तसेच शासनाच्या आदेशाचे पालन न करता संबधीत कंपनीने आपल्या मनमानी कारभाराने क्षमतेपेक्षा जास्त स्फोट घडून आणला असा आरोप ग्रामस्थ व या भागातील ग्रामपंचायतींनी करून या भागातील ग्रामस्थांनी असे स्फोट पुन्हा घडवून आणू नये म्हणून याला विरोध केला.
बाधित घरमालकांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय हे सुरुंग भुयारी क्षमतेपेक्षा जास्त स्पोर्ट घडून आणू नये म्हणून या भागातील सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच केळवा सागरी पोलीस ठाणे येथे शनिवारी दुपारी जमा झाले असताना कंपनी अधिकारी यांना बाधित घरमालकांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी व क्षमतेपेक्षा जास्तच भुयारी स्पोर्ट घडून आणू नयेत अशा सूचना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभा राऊळ केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी दिल्या.