

अनिल साक्षी
जम्मू : कटारा ते अमृतसर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन मार्च 2026 च्या शेवटच्या दिवसांपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांची कनेक्टिव्हिटी तात्पुरती प्रभावित झाली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे, जम्मू-अमृतसर मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
उत्तर भारतातील हाय-स्पीड रेल नेटवर्कच्या विस्ताराच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, नेशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) प्रस्तावित अमृतसर-जम्मू हाय-स्पीड रेल कॉरिडॉरसाठी अंतिम अलाईनमेंट डिझाईन तयार करण्याच्या उद्देशाने निविदा मागवल्या आहेत.
हा प्रकल्प भारताच्या दीर्घकालीन हाय-स्पीड रेल्वे धोरणाचा भाग आहे. दिल्ली-अमृतसर-कटारा कॉरिडॉरच्या उत्तरेकडील एक्सटेन्शन म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. अधिकार्यांनी सांगितले की, निविदा प्रक्रिया पूर्ण होताच अंतिम अलाईनमेंट डिझाईनचे काम सुरू होईल, ज्यामुळे सविस्तर इंजिनिअरिंग आणि बांधकाम योजनेची तयारी केली जाईल. हा प्रकल्प सरकारच्या विकसित भारत 2047 द़ृष्टिकोनानुसार, टिकाऊ, तंत्रज्ञान-आधारित आणि जागतिक दर्जाचा रेल इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
निविदा माहितीनुसार, एनएचएसआरसीएलने या प्रकल्पासाठी पात्र कंपन्यांकडून ई-निविदा मागवली असून, या डिझाईन कामासाठी अंदाजे 75.47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील रेल कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या सरकारच्या योजनेतील हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. प्रस्तावित कॉरिडॉर 240 किलोमीटरहून अधिक लांबीचा असेल. त्यामुळे अमृतसर आणि जम्मू दरम्यान प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
अर्बन इन्फ्रा ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ ममताल शाह यांनी स्थानिक वृत्तसंस्थेला सांगितले की, अमृतसर-जम्मू हाय-स्पीड रेल कॉरिडॉर भारताच्या आधुनिक, हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीच्या दिशेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा कॉरिडॉर सांस्कृतिक व आर्थिक अडथळे दूर करेल. उत्तर भारतात जलद प्रवास, प्रादेशिक एकत्रिकरण आणि नवीन विकास संधी निर्माण करेल. या कॉरिडॉरच्या सुरू होण्यानंतर अमृतसर-जम्मू प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि क्षेत्रातील लॉजिस्टिक्स व व्यापार कार्यक्षमता वाढेल.