बोईसर ः बोईसर एमआयडीसी परिसरातील सुनील ग्रेट प्रोसेसरी या कंपनीत फॉस्फोरिक ॲसिड सॉलिडवर प्रक्रिया सुरू असताना सोमवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आलेले नाही.फॉस्फोरिक ॲसिड सॉलिडवर प्रक्रिया सुरू असतानाच आग लागल्याने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली, प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना होत्या का, तसेच सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आगीमुळे कंपनीचे किती नुकसान झाले, याचीही माहिती स्पष्ट झालेली नाही.
बोईसर एमआयडीसीमध्ये यापूर्वीही विविध कंपन्यांमध्ये आग, रासायनिक गळती आणि इतर औद्योगिक दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ आग विझविण्यापुरती यंत्रणांची धावपळ न होता, दुर्घटनेमागील कारणांचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.
औद्योगिक वसाहतीत वारंवार दुर्घटना घडत असतील तर संबंधित कंपन्यांची सुरक्षा तपासणी नेमकी किती गांभीर्याने केली जाते, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची केवळ कागदोपत्री चौकशी न करता कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.