बोईसर : बोईसर-चिल्हार मार्गावरील वारंगडे येथील विराज कंपनीसमोरील गतिरोधक सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या गतिरोधकावरील पांढरे पट्टे पूर्णपणे पुसट झाल्याने वाहनचालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही. परिणामी अचानक वेग कमी करताना वाहनचालकांची तारांबळ उडत असून, या ठिकाणी अपघातांच्या घटना घडत असताना एमआयडीसी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी गतिरोधक उभारण्यात आले होते, त्या काळात तारापूर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या एका तरुणाचा कामावरून घरी परतत असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही संबंधित यंत्रणांनी गतिरोधकाची देखभाल आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे कितपत लक्ष दिले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बोईसर-चिल्हार मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात औद्योगिक वाहने, अवजड वाहने, दुचाकी तसेच खासगी वाहनांची ये-जा सुरू असते. विशेषतः तारापूर औद्योगिक वसाहतीतील कामगार या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अशा परिस्थितीत गतिरोधकावर स्पष्ट पांढरे पट्टे, दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी सहज लक्षात येतील असे रिफ्लेक्टर असणे आवश्यक आहे. मात्र, वारंगडे येथील विराज कंपनीसमोरील गतिरोधकाची सद्यस्थिती पाहता वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, बोईसर-चिल्हार मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत असले, तरी केवळ वाहतूक नियंत्रण आणि जनजागृती पुरेशी ठरणार नाही. रस्त्यावरील धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती, गतिरोधकांवर स्पष्ट पट्टे मारणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा रस्त्याची देखभाल करणाऱ्या तारापूर एमआयडीसी यंत्रणेने या गतिरोधकाची तातडीने दखल घेऊन पांढरे पट्टे मारावेत, दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आणखी एखाद्या निष्पाप वाहनचालकाचा बळी गेल्यानंतरच संबंधित यंत्रणांना जाग येणार का, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.