Palghar Politics Amit Ghoda
कासा : पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. पालघर मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाणे सहकारी बँकेचे विद्यमान संचालक अमित घोडा यांनी भाजपला रामराम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.
ऐन जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे घोडा यांच्या पक्षप्रवेशामुळे डहाणू आणि पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय गणिते बदल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रवेशावेळी त्यांच भाऊ दिलीप घोडा, तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पालघरचे विद्यमान आमदार राजेंद्र गावित, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा वैदेही वाढण यांच्यासह पालघर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
अमित घोडा यांची ही घरवापसी पालघर आणि डहाणू मतदारसंघात भाजपासठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपमध्ये गेल्या काही काळापासून अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून, नुकत्याच झालेल्या तालुकानिहाय नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली होती. भाजपच्या अनेक राजकीय कार्यक्रमात तसेच पक्षाच्या पदाधिकारी निवडतेवेळी जिल्हाध्यक्ष हे मनमानी व काही पदाधिकारी यांना विश्वासात घेत नसल्याने घोडा यांनी अनेकवेळा कार्यकर्त्यांसमोर नाराजी व्यक्त केली होती.
तलासरीमध्ये नवीन तालुका अध्यक्ष निवडीवरून भाजप डहाणू मतदारसंघातचे उमेदवार आणि माजी तालुका अध्यक्ष विनोद मेढा यांनी नवीन तालुका अध्यक्ष यांचे शुभेच्छा बॅनर भरदिवसा कार्यकर्त्यांसह काढून टाकले होते. त्यामुळे भाजपमध्ये डहाणू, तलासरी आणि पालघरमध्ये पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु आहे. याचा फायदा घेत घोडा यांनी आपल्या समर्थकांसह भाजपचा निरोप घेतला.
या घडामोडींमुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये समीकरणे बदलण्याची बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा बळकट होत असून, भाजपसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे.
राजकीय वर्तुळात घोडा यांची शिवसेनेत पुनरागमन ही ताकद वाढवणारी घडामोड ठरत असून, पालघर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा आता बदलणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.