मनवेलपाडा: शहरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रिक्षा वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. मात्र, काही रिक्षाचालकांकडून नियमांचे उल्लंघन करत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याचे प्रकार सुरू असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षाचालकांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
वसई-विरार शहरातील विविध भागांत रिक्षांमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. काही रिक्षांमध्ये मागील आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात, तर काही वेळा प्रवाशांना अक्षरशः कोंबून वाहतूक केली जाते.
गर्दीच्या वेळेत हा प्रकार अधिक प्रमाणात दिसून येत असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. विशेषतः रेल्वे स्थानक परिसर, प्रमुख बाजारपेठा, वर्दळीचे रस्ते आणि कार्यालयीन भागात प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत काही रिक्षाचालक अधिक प्रवासी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे रिक्षांवरील अतिरिक्त भार वाढतो आणि वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण होते. परिणामी प्रवाशांसह इतर वाहनचालकांच्याही सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असून, अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी तपासणीही वाढवण्यात आली आहे.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.दरम्यान, प्रवाशांनीही रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असल्यास अशा रिक्षातून प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
काही रुपयांच्या बचतीसाठी किंवा घाईमुळे प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.