खानिवडे : पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक मांडवी कोट परिसरातून पुरातन देवमूर्ती चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे इतिहासप्रेमी व स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांच्या श्रमदानातून संवर्धन करण्यात आलेल्या या मूर्ती अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने वारसा जतनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे चोरीस गेलेली मूर्ती वजनदार असून ती कोणी, कशी आणि केव्हा नेली याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मांडवी कोट परिसरात नियमितपणे पर्यटक, दुर्गप्रेमी व स्थानिक नागरिकांची वर्दळ असतानाही ही घटना कोणाच्या लक्षात न येणे आश्चर्यकारक मानले जात आहे.
मांडवी कोटाच्या संवर्धनासाठी अनेक दुर्गप्रेमी आणि इतिहास संवर्धकांनी सातत्याने श्रमदान केले आहे. अशा परिस्थितीत पुरातन देवमूर्ती चोरीस जाणे ही केवळ चोरीची घटना नसून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर झालेला आघात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर किल्ला परिसरातील सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऐतिहासिक वास्तू व पुरातन अवशेषांचे संरक्षण करण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात येत आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, चोरीस गेलेली मूर्ती तातडीने शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच मांडवी कोट परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी दुर्गप्रेमी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
"देवालाही सोडले नाही!"
मांडवी कोटातील पुरातन देवमूर्ती चोरीस गेल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी यापुढे अधिक सतर्क राहून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.