Satara Theft: मसूर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी
theft
theftPudhari
Published on
Updated on

मसूर : मसूर शहरासह परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी व घरफोडीच्या प्रयत्नांच्या घटना घडवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, यातील एक घरफोडीची घटना मसूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्त व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रथम वाघेश्वर येथील मदन जाधव यांच्या घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला. कपाट उचकटून सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

यानंतर चोरट्यांनी मसूर-किवळ रस्त्यालगत श्री शिवाजी विद्यालयाच्या पाठीमागील भागातील सेवानिवृत्त शिक्षक मोहन कुंभार यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, खिडकी तोडताना झालेल्या आवाजामुळे घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. यानंतर त्यांनी शिवाजीनगर परिसरातील वसंत शेडे यांच्या घराला लक्ष्य केले. खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत चोरट्यांनी कपाट उचकटून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले.

मात्र, त्यांच्या हाती कोणतीही मौल्यवान वस्तू लागली नसल्याचे समजते. एका रात्रीत सलग तीन ठिकाणी चोरट्यांनी केलेल्या धाडसी प्रयत्नांमुळे मसूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news