Kalyan-Dombivali Crime : कल्याण-डोंबिवलीत चोरीचे सत्र सुरूच; चेन स्नॅचिंग-घरफोडीत साडेचौदा लाखांचा ऐवज लंपास

Chain Snatching
Chain Snatching(AI Photo)
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीण परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या २४ तासांत घडलेल्या चेन स्नॅचिंग आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पादचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मिळून चोरट्यांनी तब्बल १४ लाख ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला असून, वाढत्या चोऱ्यांमुळे विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.

इव्हनिंग वॉक दरम्यान मंगळसूत्र लंपास

पहिली घटना कल्याण पश्चिमेतील राधानगर परिसरात घडली. येथील रहिवासी मीना शिवदास देवरे (वय ५०) या रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसह वायले स्पोर्ट्स क्लब परिसरातील रस्त्यावर नेहमीप्रमाणे इव्हनिंग वॉक करत होत्या. त्याच वेळी ३० ते ३५ वयोगटातील एक अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आला. काही समजण्याच्या आतच त्या तरुणाने मीना यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या आपल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून त्याने पोबारा केला. या प्रकरणी मीना देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पादचारी महिलांना लक्ष्य करून दागिने पळवण्याच्या घटना वाढल्याने, पोलिसांनी परिमंडळ ३ च्या क्षेत्रात गस्त वाढवावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे.

दिवसाढवळ्या घरफोडी; १३.२५ लाखांचा ऐवज चोरीला

दुसरी घटना कल्याण येथील अशोक नगर (वालधुनी) परिसरात घडली. येथे राहणाऱ्या बबिता सुरेश उनवणे (वय ३७) यांच्या बंद घराचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १३ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी दिवसाढवळ्या घडली. शनिवारी सकाळी बबिता या आपल्या कुटुंबासह काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दुपारी जेव्हा त्या घरी परतल्या, तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि मोठी रोकड चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये सतत घडणाऱ्या या गुन्हेगारी घटनांमुळे आता रात्रीसह दिवसा आणि संध्याकाळच्या वेळीही नागरिकांना, विशेषतः महिलांना सुरक्षितपणे फिरणे कठीण झाले आहे. पोलिसांनी या परिसरातील गस्त तात्काळ वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी आता कल्याण-डोंबिवलीकरांमधून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news