Palghar News Pudhari
पालघर

Palghar News: पर्यटनस्थळ विकासाच्या नावाखाली बोगस कामांचा सुळसुळाट

मोखाड्यातील ओसरविरा येथे संरक्षण भिंतीत दगडांचा वापर; ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मोखाडा: प्रादेशिक पर्यटन विभागाकडून पालघर जिल्ह्यात अनेक पर्यटनाची कामे हाती घेण्यात आली आहेत मात्र ही कामे मंजूर करताना पर्यटन वाढीसाठी याचा फायदा होईल की नाही याचे कसलेही मूल्यांकन न लावता फक्त या कामातून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचेच कसे फायदे होईल अशीच कामे घेतली असल्याचे एकूणच चित्र आहे.

यातील मोखाडा तालुक्यातील ओसरविरा या ठिकाणी प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे या मंदिराच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर सध्या एका संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. या कामाची एकूण रक्कम 25 लाख आहे.

मात्र या कामाचा नेमका या पर्यटन स्थळाला काय फायदा हा संशोधनाचा विषय आहेच मात्र तरीसुद्धा गरजेच्या ठिकाणी काम न घेता चालू असलेले हे काम देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे असून संरक्षण भिंतीच्या नावाखाली थेट दगडांच्या भिंती उभारल्या जातात की काय असे चित्र आहे.

कारण की सिमेंट खडी टाकून घ्या संरक्षण भिंती उभारणे आवश्यक असताना यामध्ये थेट मोठ मोठ्या दगडांचा वापर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे याशिवाय ठेकेदारांचे भरोशावर हे काम सोडून या संबंधित अधिकारी देखील याकडे लक्ष का देत नाहीत असा सवाल देखील आता विचारला जात आहे.

आजवर मोखाडा तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळावर कोट्यवधीचा निधी खर्च झालेला आहे.ह्या निधीमुळे त्या पर्यटन स्थळाचा विकास किती झाला हा खरंतर संशोधनाचाच भाग आहे. मात्र आता प्रादेशिक पर्यटन विभागाकडून देखील अशा अनेक कामांना मंजुरी देण्यात येत आहे.

यातील मोखाडा तालुक्यात ओसरविरा या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे हे या विभागाने काम मंजूर केले आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट दिसत आहे कारण की काम करताना थेट यामध्ये मोठ्या दगडांचा वापर केलेला आहे यामुळे ही संरक्षण भिंत तात्काळ निष्काशीत करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून समोर येत आहे.

मुळात पर्यटन स्थळाची विकास कामे मंजूर करताना पर्यटकांना त्याचा थेट फायदा होईल सुविधा वाढतील अशी कामे घेणे आवश्यक आहे आणि तशा अनेक कामांना ओसरविरा या ठिकाणी काम करण्यास संधी देखील आहे.

मात्र अशी आवश्यक कामे सोडून भलत्याच रस्त्यावर संरक्षण भिंत घेण्यामागे या पर्यटन विभागाचा नेमका उद्देश काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या कामाच्या दर्जा बरोबरच अशी कामे मंजूर होतात कशी त्यांची निविदा प्रक्रिया देखील कशी होते याचा देखील सखोल तपास होणे आवश्यक बनले आहे.

निविदा प्रक्रियेची चौकशी हवी

प्रादेशिक पर्यटन विभागाकडून जी पर्यटन स्थळांची कामे मंजूर करण्यात आली या कामांची प्रक्रिया सुरुवातीपासूनच एक विशिष्ट ठेकेदार करत असल्याचे चित्र आहे यामुळे सदरची कामे मंजूर करताना मंत्रालय स्तरावर टक्केवारी दिली जाते अशा देखील चर्चा आहेत यामुळे सदरचे काम टक्केवारी दिलेल्या ठेकेदाराला कशी मिळेल यासंबंधीची प्रक्रिया संबंधित अधिकारी राबवत असल्याचा आरोप आहे.

यामुळे या कामांची निविदा प्रक्रियेत मोठा घोळ असल्याचे देखील दिसून येत आहेत कारण की मर्जीतील ठेकेदाराला हे काम देण्यासाठी किंवा टक्केवारी दिलेल्या ठेकेदाराला हे काम मिळण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असल्याचे देखील चित्र आहे. यामुळे मोखाडा तालुक्यातील ओसरविरा याच ठिकाणी नाही तर जिल्ह्यात प्रादेशिक पर्यटन विभागाकडून आत्तापर्यंत करण्यात आलेल्या सर्वच कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT