बोईसर ःपालघर तालुक्यातील एना-गारगाव मार्गावरील सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या रस्ते कामावरून वाद तीव्र झाला असून, जिल्ह्यातील रस्त्यांची वास्तविकता पुन्हा एकदा समोर आली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत असताना, सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
एना ते गारगाव या सुमारे 8 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर अभय जाधव यांच्या कंपनीमार्फत डांबरीकरण सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी करता हा रस्ता आधीच सुस्थितीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, अशा रस्त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यामागील उद्देश काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागांत आजही रस्त्यांची दयनीय अवस्था असून, पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक ठप्प होते. काही ठिकाणी तर रुग्णांना, विशेषतः गर्भवती महिलांना, झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ येत असल्याची वस्तुस्थिती आहे. अशा पार्श्वभूमीवर सुस्थितीत रस्त्यावर करण्यात येणारे काम हे प्राधान्यक्रमांच्या पूर्णतः विरोधात असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया देत काम नियमानुसार सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावरील व्हिडिओ व छायाचित्रांमधून कामात निकृष्टता दिसून येत असल्याचा दावा नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित न राहता शाखा अभियंत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. “जमिनीवरील वास्तव न पाहता दिलेली प्रतिक्रिया ही जनतेची दिशाभूल करणारी आहे,” अशी टीका स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले की, “एका बाजूला ग्रामीण भागात आजही रस्त्याअभावी गर्भवती महिलांना झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ येते, तर दुसऱ्या बाजूला सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. सदरच्या रस्त्यावर पावसाळ्यानंतर काही मोजक्याच ठिकाणी खड्डे पडले होते, याबाबत तक्रार केली होती त्यावेळी रस्ते दुरुस्ती म्हणजे डीएलपी हा प्रकार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह आहे शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी एक टक्केवारीचा भाग आहे.
येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा तीच परिस्थिती असेल ” एकीकडे खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असताना, दुसरीकडे सुस्थितीत रस्त्यावर कोट्यवधींचा खर्च होत असल्याने या संपूर्ण प्रकाराची तुलना ‘खट्टा मिठा’ चित्रपटातील व्यवस्थेशी केली जात आहे. संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.