

सातारा : सातारा पालिकेने गेल्यावर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या नव्या रस्त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बुलडोझर लावला. प्राधिकरण 16 रस्ते खोदणार आहे. सध्या सुरू असलेल्या रस्ते खोदकामास सातारा पालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नाही. विना परवाना रस्ते खोदकाम सुरू आहे. त्यामुळे सातारा पालिका प्राधिकरणाविरोधात काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी प्राधिकरणाचे खोदकाम विना परवाना असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
साताऱ्यात गेल्यावर्षी कोट्यवधी रूपयांचा खर्च करुन तयार केलेल्या नव्या रस्त्यांवर पुन्हा बुलडोझर फिरू लागल्याने शाहूनगर-गोडोलीतील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. रस्ते केल्यानंतर पुन्हा खोदकाम करण्यात येत असल्याने प्राधिकरणाचे वरातीमागून घोडे, अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे हे खोदकाम सातारा पालिकेची कोणतीही परवानगी न घेता सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तब्बल 16 रस्ते फोडण्यात येार असून या कामाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिका काय भूमिका घेतेय, याकडे लक्ष लागले आहे.
साताऱ्यातील विविध भागांत गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यात आले होते. या कामांसाठी सातारा पालिकेने कोट्यवधींचा निधी खर्च केला होता. पालिकेने नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने अनेक ठिकाणी नव्याने रस्ते तयार केले. मात्र हे रस्ते तयार होऊन अवघा काही काळ उलटत असतानाच त्यावर पुन्हा खोदकाम सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकराकडून पाणीपुरवठा योजनांशी संबंधित कामांसाठी साताऱ्यातील 16 रस्ते खोदण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. काही ठिकाणी खोदकामासाठी जेसीबी आणि यंत्रसामग्रीचा वापर करुन रस्ते उकरण्यात येत आहेत. या खोदकामामुळे नव्याने तयार केलेल्या रस्त्यांचे नुकसान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. नव्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडू लागल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या संपूर्ण प्रकरणातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे हे खोदकाम सातारा पालिकेची अधिकृत परवानगी न घेता सुरु करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिकेच्या नियमांनुसार शहरातील कोणताही रस्ता खोदण्यापूर्वी संबंधित विभागाने पालिकेकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच खोदकामानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारीही संबंधित विभागावर असते. मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करूनच प्राधिकरणाने थेट खोदकाम सुरू केल्याचा आरोप पालिका पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, साताऱ्यातील नागरिकांमध्येही या प्रकारामुळे नाराजी पसरली आहे. नव्याने केलेले रस्ते काही महिन्यांतच पुन्हा खोदले जात असल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची टीका केली जात आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले तर पावसाळ्यात प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. योग्य समन्वय नसल्यामुळे अशा प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. आधी रस्ता तयार केला जातो आणि काही दिवसांनी दुसरा विभाग येऊन तोच रस्ता पुन्हा उकरतो. त्यामुळे विकाकसमांच्या दर्जा आणि नियोजन यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या पार्श्वभूमीवर सातारा पालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात नेमकी कोणती कोरवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विना परवाना सुरू असलेले हे खोदकाम तात्काळ थांबवले जाईल का, तसेच आधीच उकरलेल्या रस्त्यांची जबाबदारी कोण घेणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
सार्वजनिक निधीतून केलेल्या नव्या रस्त्यांवर पुन्हा बुलडोझर फिरल्याने शहरताील विकासकामांच्या नियोजनावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता पालिका प्रशासन या प्रकरणात किती कठोर भूमिका घेते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कोणती कारवाई करते, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.