Bribe News Pudhari
पालघर

Bribe Case: वसईतील पेल्हारमध्ये महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; 45 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा: वसई-विरार परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई सुरू असतानाच पेल्हार येथे एका महिला तलाठ्याला 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. उज्वला प्रवीण पाटील (वय 48) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार आणि त्यांच्या मामांचा चाळ बांधकाम व्यवसाय असून, 2015 मध्ये मामाने मौजे बिलालपाडा येथील सर्व्हे क्रमांक 13/3 मधील जमीन खरेदी केली होती.

संबंधित जागेवर न्यायालयीन वाद सुरू असतानाही तक्रारदार आणि त्यांच्या मामांनी एकूण चार खोल्यांचे बांधकाम केले होते. तसेच जागेवर माती भरावाचे कामही करण्यात आले होते. या बांधकामाची पाहणी करण्यासाठी तलाठी उज्वला पाटील यांनी भेट दिली होती.

बांधकाम व माती भरावाचा पंचनामा न करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला 50 हजारांची मागणी केली. त्यानंतर रूम बांधकामासाठी 45 हजार आणि माती भरावासाठी दीड लाख, अशी एकूण 1.95 लाखांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदाराने थेट पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने 21 व 22 मे रोजी पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर सोमवारी पेल्हारगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी 45 हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना तलाठी पाटील यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक दादाराम करांडे, पोनि. राकेश डांगे व अंमलदार धारणे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT