उत्तर महाराष्ट्र

मालेगाव : त्याचा तो सूर शेवटचा ठरला ; ‘गिरणा’च्या पूरपाण्यात तरुण बेपत्ता

गणेश सोनवणे

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
दर पावसाळ्यात गिरणा नदीला पूर आला की त्यात अतीउत्साही मुलांचा हकनाक बळी जाण्याची चिंताजनक मालिका यंदाही खंडीत झाली नाही. पट्टीचा पोहणारा अशी बिरुदावली मिरवणार्‍या तरुणाने गिरणा पुलावरुन नदीत सूर मारला, परंतु, तो नंतर कुणाच्या दृष्टीस पडला नाही. ही उडी त्याची अखेरची ठरली. बुधवारी (दि. 13) सायंकाळी ही घटना घडली.

नईम अहमद मो. अमीन (23) असे त्या तरुणाचे नाव आहे. सद्या बकरी ईदच्या सुट्टीचा कालावधी सुरु आहे. त्यातच गिरणा नदीला हंगामातील पहिला पूर आल्याने नागरिकांची पूरपाणी पाहण्यासाठी गर्दी होत आहे. बुधवारी नईमही मित्रांसमवेत शहराच्या प्रवेशद्वारावरील गिरणा पुलावर गेला होता. कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यालगत हा पूल आहे. त्यावरुन प्रचंड वेगाने पाणी प्रवाहीत होत आहे. हा जलप्रपात बंधार्‍याबाहेर जिथे कोसळतो, त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या पुलावरुन नदीत उडी घेण्याचा धाडसी मोह नईमला झाला. तो पुलाच्या कठड्यावर उभा राहताच बघ्यांचे त्या दिशेने मोबाईल कॅमरे स्थिरावले. नदीत सूर मारण्याचा व्हिडीओ वायरल होऊन प्रसिद्ध होण्याचा हा प्रयत्न मात्र जीवावर बेतला. नईमने साधारण 20 फुटांवरुन उडी घेतली. तो पाण्यात गेला मात्र नंतर वर आलाच नाही.

पाण्याला वेग असल्याने याठिकाणी कोणीच त्याची मदत करु शकले नाही. अग्निशमल दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी कर्मचार्‍यासह शोधकार्य केले. मात्र, अंधार पडल्यानंतर मोहीम थांबविण्यात आली. दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 14) पुन्हा 15 कर्मचार्‍यांनी नदीचा काठ पिंजून काढला. दुपारीपर्यंत मडकी नाल्यापर्यंत काठ आणि नदीत उतरून ठावठिकाणा घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, हाती यश आले नाही.
नईमचा अलिकडेच विवाह झाला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरवर्षी, याच पद्धतीने अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, त्यातून कुणी बोध घेत नसल्याचे अधोरेखित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT