नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
देशभरातून आलेल्या भाविकांच्या मांदियाळीत मांगीतुंगी सिद्धक्षेत्र शनिवारी (दि.25) फुलले होते. प्रसन्न वातावरणात सर्वांनी श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा आनंद लुटला. पहाटेपासूनच भाविकांची सहकुटुंब ऋषभदेवपुरम येथे रीघ लागली होती. सकाळपासून उत्साहात ऋषभगिरी येथे भगवान ऋषभदेवांच्या 108 फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला. पंचामृत कलशाचा मान पुण्याच्या सुजाता शहा व परिवाराने मिळवला. अभिषेकापूर्वी त्यांनी पुणे जैन संघटनेतर्फे पीठाधिश, कर्मयोगी रवींद्रकीर्ती स्वामींजीचा पुणेरी पगडी व चलनी नोटांचा हार घालून सत्कार केला.
प्रथम कलशाचा मान कोलकात्याचे अजित पांड्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांना देण्यात आल्याने त्यांनी धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. पवित्र जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृताभिषेक करून भाविकांनी पुण्यप्राप्ती केली. महाशांतिधारा कलशाचा मान राजस्थानातील भाविकांनी मिळवला. महामंत्री संजय पापडीवाल व पदाधिकार्यांच्या यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला.
मंगलाचरणाने प्रारंभ होऊन डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. हस्तिनापूर येथून ऑनलाइन संवाद साधताना आर्यिकारत्न डॉ. चंदनामती माताजी व गणिनिप्रमुख ज्ञानमती माताजी यांनी, मांगीतुंगी सिद्धक्षेत्री महामस्तकाभिषेक करण्याची संधी केवळ पुण्यवान असणार्यांनाच मिळते, असे विचार मांडले.
भाविकांचे तीर्थाटन
सुजाता शहा यांनी केलेली महाराष्ट्रीयन नऊवारी लुगडे, पगडी, नथ, ठुशी, कोल्हापुरी साज ही वेशभूषा लक्षवेधी ठरली. भाविकांनी पिवळ्या, केशरी रंगाची वस्त्रे परिधान केली होती.बालगोपालदेखील पारंपरिक पोशाखात सजले होते. युवक – युवतींनी स्तोत्र पठण केले. वाहतुकीची व्यवस्था सुरळीतपणे सुरू ठेवल्याने भाविकांना सुलभ दर्शन झाले. परराज्यातील भाविकांनी शिर्डी, पैठण, नाशिकचे गजपंथ, अजिंठा – वेरूळ या जवळच्या तीर्थक्षेत्रांना भेट दिली.