शासकीय रुग्णालयाला झुडुपांचा विळखा | पुढारी

शासकीय रुग्णालयाला झुडुपांचा विळखा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाला झाडा-झुडुपांनी परिसराला विळखा पडला आहे. अशा स्थितीत नागरिकांच्यात उपचार घेताना रात्रीच्यावेळी भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रुग्णांमधून संताप व्यक्‍त केला जात आहे.
‘बी’ ब्लॉकच्या इमारतीभोवती काटेरी झाडे-झुडुपे नाहीत, परंतु ओपीडी इमारतीच्या पाठीमागे, पोस्ट मॉर्टेम, टीबी वॉर्डाच्या भोवती गवत आणि काटेरी झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः टीबी वॉर्डाच्या समोरील पटांगणात गवत वाढले असून हे गवतदेखील सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडून काढले जात नाही.

याचठिकाणी रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा वावरदेखील अधिक असतो. त्यामुळे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना त्रास होतो. मागील काही दिवसांपूर्वी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉ. सुरेश कंदले यांनी येथील परिसर पूर्णपणे स्वच्छ केला होता. त्यानंतर या परिसरामध्ये पुन्हा झाडे-झुडुपे वाढली आहेत. झाडे-झुडुपे आणि अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना उपचार घेणे कठीण झाले आहे.

विशेष म्हणजे पीएम आणि टीबी वॉर्डाकडील इमारतीच्या भोवती झाडे-झुडुपे इतकी वाढली आहेत की रात्रीच्या वेळी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरच येता येत नाही. येथील पाणीपुरवठ्याच्या टाकीची देखील दुरवस्था झाली आहे. टीबी वॉर्डातील इमारतीचा रंग पूर्णपणे गेला आहे. तसेच खिडक्या-दरवाजेदेखील जीर्ण झाले आहेत. त्यामुळे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना येथील अस्वच्छतेचा नाहक त्रास होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
सिव्हिल हॉस्पिटलमधील काटेरी झाडे, गवत हे नियमितपणे काढण्याचे काम प्रशासनाचे आहे. स्वच्छतेकडील दुर्लक्षामुळे रुग्णांना नाहक त्रास होत आहे. केवळ ‘बी’ ब्लॉक वगळता इतर इमारतींच्या भोवती काटेरी झाडे आणि अस्वच्छता दिसत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होत आहे.

Back to top button