नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख लाभलेल्या इगतपुरीसह त्र्यंबकेश्वरकडे पावसाने ऐन जून महिन्यात पाठ फिरविली आहे. या दोन्ही तालुक्यांत जूनमधील सरासरीच्या अवघ्या 30 टक्क्यांहून कमी पर्जन्याची नोेंद झाली. अवर्षणग्रस्त मालेगाव, नांदगाव व चांदवडसह 9 तालुक्यांनी जूनची सरासरी गाठली. जिल्ह्यात आजमितीस सरासरी 113 मिमी पाऊस झाला असून, त्याचे प्रमाण 81 टक्के आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरू आहे. त्यामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, चालू महिन्यात आतापर्यंतचा मान्सूनच्या लहरीपणाचा परिणाम जीवनमानावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. जूनच्या प्रारंभी जोरदार आगमन झाल्यानंतर पावसाने पुढील दोन आठवडे आखडता हात घेतला होता. परिणामी पेरण्या तर रखडल्या तसेच सर्वसामान्यांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. परंतु, गेल्या 48 तासांपासून वातावरणात मोठा बदल होऊन सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्याने अवर्षणग्रस्त तालुक्यांना अक्षरश: झोडपून काढले असताना, पावसाळी तालुक्यांकडे मात्र पाठ फिरविली.
इगतपुरीचे जूनचे सरासरी पर्जन्यमान 397 मिमी आहे. आजमितीस तालुक्यात 83.2 मिमी पाऊस झाला असून, त्याचे प्रमाण 21 टक्के आहे, तर त्र्यंबकेश्वरचे पर्जन्य 254 मिमी असताना, केवळ 73 मिमी पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी 28.7 टक्के आहे. नाशिक तालुक्यात 86.2 मिमी पाऊस झाला असून, तो 70 टक्के आहे. पेठ व सुरगाण्यात अनुक्रमे 65.4 तसेच 63.1 टक्के पाऊस पडला. एकीकडे पावसाळी तालुक्यांना मान्सूनची प्रतीक्षा असताना मालेगावमध्ये 157 मिमी पाऊस झाला आहे. जूनच्या सरासरीच्या 185 टक्के इतके हे प्रमाण आहे. नांदगावला 131 टक्के म्हणजेच 121 मिमी, तर चांदवडला 156.1 मिमी (154 टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
जुलैमध्ये चांगले पर्जन्य
पावसाअभावी जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये सध्या केवळ 15 हजार 243 दलघफू पाणीसाठा आहे. हे प्रमाण 23 टक्के आहे. पावसाने दिलेल्या ओेढीने धरणांच्या घशाला कोरड पडली आहे. दरम्यान, जूनमध्ये जिल्ह्यात पावसाने आखडता हात घेतला. पण, जुलैमध्ये पाऊस सारी कसर भरून काढेल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांंनी वर्तविला आहे.