डहाणू : भरधाव वाहनांच्या धडकेत मोकाट गुरांचे जातायेत बळी | पुढारी

डहाणू : भरधाव वाहनांच्या धडकेत मोकाट गुरांचे जातायेत बळी

डहाणू विनायक पवार : मुंबई-अहमदाबाद महामार्ग रस्ते वाहतुकीत नेहमीच वर्दळीचा महामार्ग आहे. येथून सर्वात जास्त अवजड वाहने भरधाव वेगाने मार्गक्रमण करत असतात. महामार्गानजीकच्या आदिवासी पाड्यांतील मोकाट जनावरे ही चार्‍याच्या शोधात महामार्गावर येतात आणि वाहनांच्या धडकेत दगावतात. नुकतेच महालक्ष्मी विव्हळवेढे येथे चार गाईंना वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या जखमी जनावरांना मुख्य मार्गावरून रस्त्याच्या कडेला स्थानिक लोकांनी हलविले. त्यानंतर काही तासांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा करून या चार गाईंचे दफन करण्यात आले. जखमी जनावरांना वाचवण्यात तसेच अपघात रोखण्यात महामार्ग प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे मत नागरिक वर्तवत आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय वाहिनी सध्या धोक्याची वाहिनी म्हणून ओळखली जात आहे. या वाहिनीवर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असून निष्पाप बळी जात आहेत. मात्र महामार्ग प्रशासनाला कुठलीही दखल द्यायला वेळ नाही.

अपघात झाल्यानंतर सुद्धा महामार्ग प्रशासनाचे कर्मचारी कधीच वेळेत पोहोचत नाहीत. त्यात अनेक ठिकाणी ढाबेवाले तसेच पेट्रोल पंप यांच्यासमोरील रस्ता क्रॉसिंगचे कट सुद्धा जीवघेणे ठरले आहेत. मात्र या क्रॉसिंग कट वर सुद्धा कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघातांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

त्यातच सध्या याच राष्ट्रीय महामार्गावर मोकाट गाई, वासरे मृत्युमुखी पडण्याचा आकडा देखील वाढत आहे. मनोर ते अच्छाड यादरम्यान मेंढवन, तवा, सोमठा, चारोटी, महालक्ष्मी, आंबोली, दापचेरी तलासरी या दरम्यान रोज दोन ते तिन मोकाट जनावरांचा वाहनांच्या जखमी अवस्थेत पाहायला मिळत आहेत. या मृत्यूमुखी पडलेला मोकाट जनावरांना उचलायला महामार्ग प्रशासनाला वेळ नाही. ज्या ठिकाणी मुक्या जनावरांना उडवला जाते तेथे चार ते पाच दिवस ते जनावर त्या ठिकाणी आहे त्या स्थितीत बर्‍याच वेळा बघायला मिळाले आहेत, तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध गाडीला धडक दिली असता जखमी जनावरांना स्थानिक लोकांनी हायवेच्या कडेला ठेवून मदतीचा हात नेहमी दाखवला आहे.

कुठल्याही प्रकारच्या सुविधा वाहन चालकांना मिळत नाही. महामार्ग प्रशासनाला देखील जाग येत नाही, तसेच कुठे अपघात घडल्याची माहिती दिली असता गस्तीचे वाहन बाहेर गेले असल्याचे किंवा अर्ध्या तासात येईल, एक तासात येईल अशी उत्तरे दिली जातात. मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करायचा की नाही असा सवाल देखील स्थानिक नागरिकांना पडला आहे. जर कुठे अपघात झाला तर किमान दोन किलोमीटर पर्यंत वाहतुकीचा खोळंबा नेहमीच या महामार्गालगत बघायला मिळत आहे.

महालक्ष्मी- विव्हळवेढेत चार गाईंचा वाहनांच्या धडकेत मृत्यू; महामार्ग प्राधिकरण कुचकामी

याबाबत टोल नाका प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करूनही काही फायदा होत नाही. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी स्वतः लक्ष द्यावे.
– रमेश वायडा विव्हळवेढे, ग्रामस्थ

हेही वाचा

Back to top button