बागलाण 
उत्तर महाराष्ट्र

बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, बागलाण तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक

गणेश सोनवणे

सटाणा (जि. नाशिक ): पुढारी वृत्तसेवा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बागलाण तालुक्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. 28) राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी भगवे ध्वज फडकवत घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता बसस्थानकासमोर शिवसैनिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. सुरुवातीला शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडून वाहतूक रोखून धरली होती. याबाबत पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी दाखल होत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला, तरीही पोलिसांची नजर चुकवीत शिवसैनिकांनी ऐनवेळी बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी भावना व्यक्त करताना उपजिल्हाप्रमुख सोनवणे यांनी खरपूस भाषेत बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. आता नेमका विश्वास कोणावर ठेवायचा, या पक्षप्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सोनवणे यांनी, फक्त शिवसैनिकांवर विश्वास ठेवा. पुन्हा एकदा सगळा महाराष्ट्र भगवामय करू, असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी माजी शहरप्रमुख शरद शेवाळे, आनंदा महाले, अनिल सोनवणे, राजनसिंह चौधरी, राजू जगताप, कारभारी पगार, आनंदा लाडे, बाजीराव देवरे, सुभाष खैरनार, महेंद्र देवरे, नरेंद्र देवरे, युवराज वाघ, गणेश सोनवणे, विक्रांत पाटील, लक्ष्मण सोनवणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT