बीड : धारूर घाटात ट्रक कोसळला | पुढारी

बीड : धारूर घाटात ट्रक कोसळला

धारूर, पुढारी वृत्तसेवा : उस्मानाबाद येथून परतूरकडे 22 टन खत घेऊन जाणारा ट्रक धारूरच्या घाटातील शंभर फूट खोल दरीत कोसळला. प्रसंगावधान दाखवत उड्या टाकल्यामुळे या अपघातातून ट्रक चालक, क्लिनर बालंबाल बचावले. ही घटना सोमवारी (दि.27) मध्यरात्री घडली.

खामगाव- पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे धारूर घाटातून जाणार्‍या वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, या अवघड घाटातच रस्ता अतिशय अरूंद आहे. घाट परिसरात दुरूस्ती करण्यात आलेली नाही. तसेच घाटातील दरीच्या बाजूला असलेले कठडेही जीर्ण झाले आहेत. यामुळे या घाटात वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोमवारी (दि.27) मध्यरात्री उस्मानाबाद येथून 22 टन खत घेऊन एक ट्रक परतूरकडे निघाला होता. धारूरच्या घाटात धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. चालक आणि त्याचा सहाय्यक यांनी प्रसंगावधान दाखवत उडी मारल्यामुळे दोघांचेही प्राण वाचले. अपघातग्रस्त ट्रक दरीत शंभर फुट कोसळला. अपघातात ट्रक आणि आतील खताच्या पोत्यांचे मोठे नुकसान झाले.

Back to top button