नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिककरांना भारतीय सैन्य दलातील 120 मोर्टार गन, 122 एमएम गन, रॉकेट लॉन्चर, डीजी ड्रोग्रास यासह अन्य शस्त्रास्त्रे पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उंटवाडीतील सिटी सेंटर मॉल येथे दि. 13 ते 16 ऑगस्ट या कालावधीत ही शस्त्रे पाहता येणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सैन्य दल, सिटी सेंटर मॉल आणि युनायटेड वै स्टॅण्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'नो यूअर आर्मी' उपक्रमांतर्गत सैन्य दलातील विविध शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती मॉलच्या मार्केटिंग व्यवस्थापक सुप्रिया अरोरा यांनी दिली. सैन्य दलाचे अधिकारी, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 13) या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
तिन्ही दिवस नाशिककरांसाठी सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. तसेच प्रत्येक शस्त्रास्त्राची माहिती देण्यासाठी सैन्य दलातील अधिकारी उपस्थित असतील, अशी माहिती अरोरा
यांनी दिली.
सिम्फनी बॅण्डचे आकर्षण
प्रदर्शनात आर्मी सिम्फनी बॅण्डचे खास आकर्षण असणार आहे. रविवारी (दि. 14) सायंकाळी 5 ला आर्मी सिम्फनी बॅण्डचे सादरीकरण करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिककरांनी यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.