पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दमदार पाऊस कायम असल्याने मावळ तालुक्यातील कामशेतजवळील 10 टीएमसी क्षमतेचे पवना धरण 96 टक्के भरले आहे. बुधवार (दि.10) व गुरुवारी (दि.11) 24 तासांत धरणात तब्बल 10 टक्के साठा झाला. पावसाचा जोर कायम राहिल्यास शुक्रवारी (दि.12) सकाळपर्यंत धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपूर्वीच धरण पूर्ण भरेल.
या धरणातून पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्यातील अनेक भागांत पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यात पावसाने दडी मारली. जुलैच्या सुरुवातीला दमदार पाऊस सुरू झाल्यापासून पवना धरणात पाणीसाठा वाढीस सुरुवात झाली. केवळ 10 दिवसांत 14 जुलैपर्यंत धरण 16 टक्क्यांवरून 50 टक्क्यापर्यंत भरले. जुलैच्याअखेरीस पावसाने दडी मारल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले.
कमी व अधिक पावसामुळे तीस जुलैपर्यंत धरणात 81.47 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला. पावसाने ओढ दिल्याने साठ्यात घट होऊ लागली. साठा कमी होऊन 5 ऑगस्टला 80.47 टक्क्यांवर पाणी आले. त्यानंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओढे व नाले भरून वाहू लागले आहेत. धबधबे पुन्हा ओसंडून वाहू लागले. डोंगरमाथ्यातून पाणी वाहू लागले आहे.
बुधवारी (दि.10) सकाळी सहापर्यंत 86.34 टक्के साठा होता. त्या दिवशी व गुरुवारी जोरदार पाऊस झाल्याने गुरुवार सायंकाळी पाचपर्यंत धरणात 96 टक्के साठा झाला. केवळ 24 तासांत 10 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा वाढला आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत 1 हजार 955 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळनंतर पाऊस कमी झाला होता. मात्र, रात्री पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्यास शुक्रवारी (दि.12) सकाळपर्यंत धरण 100 टक्के भरण्याचा अंदाज आहे. तसे झाल्यास 15 ऑगस्टच्या तीन दिवस अगोदर धरण पूर्णपणे भरणार आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 94.17 टक्के पाणीसाठा होता.
पवनानदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
पवना धरणात गुरुवारी (दि.11) सायंकाळपर्यंत 96 टक्के पाणीसाठा झाला. पाऊस कमी झाला आहे. मात्र, रात्री दमदार पाऊस झाल्यास धरण शुक्रवारी सकाळपर्यंत 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. दक्षता म्हणून धरणातून पाणी सोडावे लागेल. त्यामुळे पवनानदी काठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी केले आहे.
धरणातून 2 हजार क्सुसेक विसर्ग
पवना धरणातून सध्या विद्युत निमिर्ती गृहाद्वारे 1 हजार 400 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारे पाण्याचे प्रमाण पाहून गुरुवारी रात्री दहापासून धरणाच्या सांडव्याद्वारे 2 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. नदी काठावरील रहिवाशांनी नदी पात्राजवळची साधनसामग्री, जनावरे व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.