नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वेगवेगळ्या भागांतून सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून, या प्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात संशयितांविरोधात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय, शिकवणीसाठी गेलेल्या या मुली पुन्हा घरी न परतल्याने अंबडच्या हद्दीत तीन, भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन व देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अपहरणाचा एक गुन्हा दाखल आहे.
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून राणा प्रताप चौकाजवळून मंगळवारी (दि. २१) सकाळी साडेसहाच्या सुमारास शिकवणीसाठी गेलेली १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. दुसऱ्या घटनेत स्वामीनगर परिसरातून सोमवारी (दि.२०) सकाळी साडेसातच्या सुमारास अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. तर तिसऱ्या घटनेत महाविद्यालयात जाण्यासाठी लेखानगर बसस्थानकातून रिक्षात बसलेली मुलगी बेपत्ता झाली आहे. यामुळे तिन्ही मुलींचा शोध अंबड पोलिस घेत आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर येथील अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि.२०) सकाळी अकरापासून बेपत्ता झाली आहे. तर शालिमार येथून सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एक मुलगी बेपत्ता झाली आहे. या दोन्ही मुलींचा तपास भद्रकाली पोलिस करीत आहेत. तसेच सोमवारी सकाळी भगूर येथील शाळेजवळून एक मुलगी बेपत्ता झाली असून, देवळाली कॅम्प पोलिस तपास करीत आहेत.